हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Drishyam 2 Review) दिनांक २ ऑक्टोबर आणि ३ ऑक्टोबर रोजी विजय साळगांवकर आणि कुटुंब कुठे होते..? काय करत होते..? त्यांनी काय खाल्लं..? त्यांनी काय केलं..? या सगळ्याची माहिती तुमच्याकडे असेलच. कारण जे दृश्यम २ पाहण्यासाठी आतुर आहेत किंवा ज्यांनी पाहिला आहे त्यांनी निश्चितच दृश्यम पाहिला असेल. एका ठिकाणी खिळवून ठेवणारं कथानक, विचार करायला लावणारं रहस्य आणि अंगभर रोमांच आणणारे डायलॉग यामुळे दृश्यम चित्रपट हिट ठरला. मग इथे दृश्यम २ कडून अपेक्षा वाढणे किती साहजिक आहे नाही का.? तुम्ही पाहिलात का दृश्यम २..? हो का नाही..? ज्यांचं उत्तर नाही असं आहे हा रिव्ह्यू त्यांच्यासाठी. कारण हा रिव्ह्यू वाचल्यानंतर कदाचित तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक कराल किंवा तुम्ही हा चित्रपट पाहणं ड्रॉप कराल. चला तर जाणून घेऊया कसा आहे दृश्यम २..?
दृश्यम २ या चित्रपटाचे कथानक दृश्यम चित्रपटाच्या शेवटाला जोडूनच पुढे सुरु होते. या चित्रपटाची खासियत म्हणजे खोट्याला खऱ्याचे कपडे घालून उभं करणे आणि खऱ्याला खोट्याचे कपडे घालून सोडून देणे. इथे खरं आकांताने ओरडूनही खोट्यात पडतं आणि खोटं शांतपणे आपलं काम करताना दिसत. कन्फ्युज होताय का..? चला सोप्प्या भाषेत बोलूया. दृश्यम चित्रपटातील साळगांवकर कुटुंब आजही त्या दिवशी घडलेला तो खून, ते रहस्य आपल्या मनात खोलवर दडवून जगत आहेत. हे कुटुंब ती मांजर आहे जी डोळे मिटून दूध पितेय. मधल्या काळात या कुटुंबाने आपलं आयुष्य पूर्ववत जगण्यास सुरुवात केली आहे. पण जिने स्वतःचा मुलगा गमावलाय ती मीरा..? ती कशी शांत बसेल. (Drishyam 2 Review)
बंद केलेली समीरच्या मर्डरची केस तिने रिओपन केली आहे आणि यावेळी या केसचा छडा लावायला नवीन एंट्री झाली आहे. यावेळी दृश्यम २ मध्ये तब्बू कमी वेळासाठी दिसली असली तरीही तिच्या काही मिनिटांच्या सीनमध्ये आपल्याला हि स्टोरी मागील भागाची आठवण करून देते. अक्षय खन्नाची चित्रपटातील एंट्री तुमच्या नजरेला इथे तिथे वळूच देणार नाही.. इतका हा चित्रपट उत्कंठा वाढवताना दिसतो. या चित्रपटाचे दगा या शब्दाशी अत्यंत जवळचे नाते आहे असे म्हणता येईल. कारण चित्रपटातील मुख्य नायक अजय देवगण त्याच्या अभिनयातून हि भावना अत्यंत उत्कट पद्धतीने दर्शविताना दिसत आहे. (Drishyam 2 Review)
होय मी एका मुलाचा खून केलाय म्हणत विजय साळगांवकरने कॅमेरासमोर पोलिसांना कबुली दिली. पण जर आम्ही म्हणालो कि त्याने केलेला खून हा खून नव्हताच. त्याने कधी कुणाचा खून केलाच नाही आणि कधी कुणाची हत्या झालीच नाही.. लागला ना धक्का.. तुम्हीही म्हणाल कि हे असं शक्यच नाही.. पण कबुली दिली म्हणून विजय साळगांवकर पकडला जाईल असं खरंच तुम्हाला वाटतं का..? असो यासाठी डोकं खाजवू नका. तर थेट थिएटरमध्ये जा आणि हा सिनेमा पहा. (Drishyam 2 Review) चित्रपटाचा क्लायमॅक्स तुमच्या पायाखालची जमीन ओढून घेणारा ठरणार आहे.. आता तो कसा..? हे मी का सांगू..? ते अनुभवण्यात मजा आहे ना. चित्रपटाचा शेवट बुद्धीला पटवून देण्यासाठी काही गोष्टी यामध्ये ओढून ताणून केल्या आहेत असं वाटत. पण मूळ कथानकाची गरज असल्यामुळे ते कुठेतरी माफ आहे.
मी म्हणेन कि, सध्याच्या काळामध्ये दृश्यम २ सारख्या चित्रपटाची बॉलिवूड सिने इंडस्ट्रीला प्रचंड गरज होतीच. (Drishyam 2 Review) याच कारण म्हणजे हा चित्रपट फ्लॉप होण्याची तीळमात्र शक्यता नाही आणि याचे कारण आहे चित्रपटाचे कथानक. हे कथानक मूळ साऊथ सिनेइंडस्ट्रीचे असल्यामुळे याचे पूर्ण श्रेय साऊथ इंडस्ट्रीकडे जाते. मुळात दृश्यम २ हा मल्याळम भाषेत फक्त रिलीज झाल्यामुळे हिंदी भाषिकांपैकी काही ८-१० टक्के लोकांनीच तो पाहिला आहे. ज्याचा पुरेपूर फायदा हिंदी दृश्यम २ ला होताना दिसत आहे.
(Drishyam 2 Review) पण सांगायचे झाले तर, दृश्यम २ मध्ये शक्य तितके जास्त बदल करण्याचा प्रयत्न केला गेला असला तरीही मूळ कथेला पूर्ण न्याय दिलेला आहे. दृश्यम या चित्रपटाचे दिग्दर्शन दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी केले होते. मात्र यावेळी दृश्यम २ साठी अभिषेक पाठक यांनी घेतलेली मेहनत देखील कमी नाहीये. त्यामुळे हा चित्रपट चांगले यश संपादन करेल यात काहीच शंका नाही.
एकंदरच सांगायचे तर.. हा चित्रपट एक फुल्ल पॅकेज आहे. चित्रपटातील मूळ कथेशी संबंधित पात्र साकारणारे कलाकार तेच असल्यामुळे कथानकालादेखील एक विशेष जोर मिळाला आहे. त्यामुळे जर तुम्ही हा चित्रपट पहायचा विचार करत असाल तर जरूर पहा. पैसा वसूल कथानकामुळे अरेरे पैसे वाया गेले म्हणायची वेळ तुमच्यावर नक्कीच येणार नाही. तर आपण या चित्रपटाला ५ पैकी ४ गूण देऊया.. कारण मूळ कथानक साऊथ इंडस्ट्रीचे आहे ना! तो १ मार्क त्यांना समर्पित.. !!!! मल्याळम चित्रपट पाहिलेल्यांसाठी हा चित्रपट रसभंग करणारा ठरेल मात्र ज्यांनी मल्याळम चित्रपट पाहिलेला नाही त्यांच्यासाठी हि मनोरंजनाची खास पर्वणी ठरू शकते. (Drishyam 2 Review)
Discussion about this post