हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान सर्वत्र मनोभावे स्त्री शक्तीची पूजा अर्चना केली जाते. कारण नवरात्र हा उत्सव स्त्री शक्तीच्या स्वरुपांचा जागर मानला जातो. यातील प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. या निमित्ताने शक्तीची नानाविध रूप साकारून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्रीने केलेल्या या फोटोशूटच्या माध्यमातून ती नेहमीच विविध ठिकाच्या शक्तिपीठांची रूपे अनोख्या ढंगात आपल्या चाहत्यांसमोर प्रकट करत आहे.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी अपूर्वाने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात स्थित असणारी राशीनची देवी यमाईचे स्वरूप धारण केले होते. तिचे हे स्वरूप जितके मोहक तितकेच भावणारे नयनरम्य असे होते. तिच्या चाहत्यांनी या फोटोच्या माध्यमातून आई यमाईचे दर्शन घडले अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोशूटला तिच्या चाहत्यांसह अनेको नेटकऱ्यांनीदेखील विशेष पसंती दिली आहे. तर कला मनोरंजन विश्वातील अनेकांनी तिच्या या फोटोशूटचे अत्यंत मनोभावे कौतुक केल्याचे दिसत आहे.
हा फोटो शेअर करताना अपूर्वाने कॅप्शनमध्ये लिहिले कि, नवरात्रीचा चौथा दिवस! रंग – नारींगी. देवी- जगदंबा माता – राशिन. जगदंबा माता (राशीनची देवी) मंदिर, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन या ठिकाणी आहे. देवी यमाई या नावानेही प्रसिद्ध आहे मंदिराची रचना हेमाडपंती आहे. या मंदिराच बांधकाम शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. हलती दीपमाला हे या मंदिराच खास वैशिष्टय़ आहे. मी अणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
याआधी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अपूर्वाने कोल्हापूर, करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीचे स्वरूप धारण केलेले फोटो शेअर केले होते. यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिने मुंबापुरीची ग्रामदेवता मुंबादेवीचे स्वरूप धारण केलेले फोटो शेअर केले होते. तर तिसऱ्या दिवशी तिने कर्नाटक उडपी येथील दुर्गा परमेश्वरीचे रूप धारण केलेले फोटोशूट शेअर केले होते. तिच्या या फोटोशूटला प्रचंड पसंती मिळत असून अनेकांनी तिच्या फोटोंमधून देवी आईचे दर्शन घडल्याचे म्हणत तिचे व तिच्या टीमचे कौतुक केले आहे.
Discussion about this post