हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | मराठी सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांचा स्वतःचा असा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. याचे कारण म्हणजे, तरडे यांनी आजतागायत मराठी सिनेसृष्टीला एकापेक्षा एक सरस कलाकृती देऊन मराठी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, देऊळ बंद आणि धर्मवीर या कलाकृतींनी तर फक्त प्रेक्षक नव्हे समिक्षकांकडूनसुद्धा कौतुकाची थाप मिळवली. यानंतर आता आणखी एक तोडीची कलाकृती घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तरडे सज्ज झाले आहेत. याचे संकेत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत दिले आहेत.
अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक अशी ख्याती असलेले प्रविण तरडे नेहमीच वेगळेपण जपतात. तसेच यावेळी ते जो प्रोजेक्ट घेऊन येत आहेत तो देखील एक वेगळा प्रयोग आहे. आपली माती, आपली शेती, परंपरा, संस्कृती याविषयी भरभरून बोलणारे तरडे आज एक प्रश्न विचारत आहेत. हा प्रश्न असा आहे की, ‘अण्णाभाऊंचा फकिरा असाच दिसत असेल?’ या प्रश्नासोबत त्यांनी स्वतःचा एक जुना फोटो शेअर केला आहे. तर हा फोटो आणि हा प्रश्न एकंदरच प्रचंड सूचक आहे. त्यामुळे या प्रश्नातच दडलंय उत्तर अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
View this post on Instagram
या पोस्टवर उत्तर देताना नेटकऱ्यांनी ‘ हो ‘ म्हणत सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. अनेकांनी ही पोस्ट म्हणजे आगामी चित्रपटाचा संकेत आहे असेच म्हटले आहे. एकाने तर, फकिरा साकारायची ताकद फक्त आणि फक्त तुमच्यात आहे’ अशी कमेंट केली आहे. त्याच काय आहे.., फकिरा’ ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली कादंबरी आहे. जी १९५९ साली प्रकाशित झाली होती. या कांदबरीत ‘फकिरा’ नावाच्या तरुणाचे कथानक अतिशय सुंदर शब्दात मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा ‘फकिरा’ आणि त्याची शौर्यगाथा अशी ही कादंबरी आहे. त्यामुळे तरडे यांनी विचारलेला प्रश्न पाहता नेटकरी लावत असलेला अंदाज खरा असण्याची शक्यता दाट आहे.
Discussion about this post