हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदी असो वा मराठी कोणत्याही सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या चाहत्यांच्या सानिध्यात राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नात असतात. यातील काही कलाकार तर थेट चाहत्यांच्या मध्ये वावरतातसुद्धा. तर काही कलाकार मात्र चाहत्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून अंगरक्षक नेमतात. मराठी कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर, अनेकदा हे कलाकार त्यांना वाट्टेल तिथे बिनधास्त फिरतात आणि कधी कधी तर थेट चाहत्यांशी संवादसुद्धा साधतात. आता संकर्षण कऱ्हाडेचं पहा ना. ‘तू म्हणशील तसं’ म्हणत.. हा अभिनेता थेट लोकलमध्ये प्रवास करताना दिसला. पण गुपचूप.
होय. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा अतिशय सामान्य आयुष्य जगणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. उत्तम अभिनेता आणि कवी असूनही त्याचे पाय अद्याप जमिनीवर आहेत हे विशेष. आपल्या नाटकाच्या निमित्ताने त्याचा बराच इथून तिथून प्रवास होत असतो. दरम्यान चारचाकी गाड्या घेऊन फिरण्यापेक्षा कधीही लोकल बरी अशा काहीश्या मताचा संकर्षण अगदी सामान्यांप्रमाणे लोकलने प्रवास करतो. याहीवेळी त्याने असाच लोकलने प्रवास केला आणि दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
टीव्ही मालिका इंडस्ट्रीमध्ये अभिनेता आणि एक उत्कृष्ट कवी म्हणून संकर्षण कऱ्हाडेची ओळख आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या संकर्षण झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसतो आहे.
या मालिकेतील मुख्य पात्र यश म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदे याचा मित्र समीर या भूमिकेत संकर्षण काम करत आहेत. याशिवाय ‘तू म्हणशील तसं’ या नाटकातील मुख्य पात्र तो साकारत आहे. सध्या विविध ठिकाणी या नाटकाचे यशस्वी प्रयोग सुरु आहेत.
तसेच ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकाचा सूत्रधार स्वतः संकर्षण आहे. या नाटकात अभिनेता प्रशांत दामले आणि वर्ष उसगांवकर मुख्य भूमिकेत आहेत.
Discussion about this post