हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखादा कलाकार रंगभूमीवर जगतो आणि रंगभूमीसाठी संपूर्ण आयुष्य वाहतो. हात कितीही आभाळाला टेकले तरीही रंगभूमीची ओढ संपत नाही असे अनेक कलाकार आपण पाहिले आहेत. अशा कलाकारांसाठी रंगभूमीच माय आणि रंगभूमीच बाप. आज हि रंगभूमी धाय मोकलून आसवं गाळत असेल कारण आज सकाळी नाट्य विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला. जेष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि दिग्दर्शक अजित भगत यांचे आज पहाटे निधन झाले. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे हे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ रंगकर्मी अजित भगत यांचे ४ एप्रिल २०२३ रोजी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामूळे त्यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ रंगकर्मी अजित भगत यांच्यासाठी रंगभूमी हा जीव होता. अजित भगत म्हणजे ऍब्सर्ड आणि ऍब्स्ट्रॅक्ट शैलीचा लिलया वापर करून नाटक जगणारे रंगकर्मी. अजित भगत यांना प्रायोगिक नाटकाचे ‘शेवटचे भीष्माचार्य’ म्हटले जायचे. आज त्यांच्या निधनाने रंगभूमीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
एक चालते फिरते नाट्यविद्यापीठ म्हणजे अजित भगत. ‘जांभूळ आख्यान’, ‘सगेसोयरे’, ‘आर्य चाणक्य’, ‘सापत्नेकराचं मूल’, ‘मुंबईचे कावळे’, ‘जय जय रघुवीर समर्थ’, ‘झाला अनंत हनुमान’, ‘अरण्य-किरण’ अशी प्रायोगिक रंगभूमी गाजवणारी अनेक नाटके अजित भगत यांनी दिग्दर्शित केली होती. फक्त दिग्दर्शन नव्हे तर त्यांनी अभिनय क्षेत्रातही आपली छाप पाडली आहे. ‘एक वाडा झपाटलेला’, ‘इसापचा गॉगल’ अशा काही नाटकांमधील अजित भगत यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली.
Discussion about this post