हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच टीव्ही मनोरंजन क्षेत्रातून अत्यंत दुःखद बातमी समोर अली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचे निधन झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जिममध्ये वर्कआऊट करत असताना सिद्धांत अचानक बेशुद्ध पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि त्याने जगाचा निरोप घेतला. साधारण २००१ साली सिद्धांताने करिअरला सुरुवात केली आणि आतापर्यंत त्याने २० मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी नेहमीप्रमाणे जिममध्ये वर्कआउट करत होता. यावेळी त्याला अचानक भोवळ आली आणि तो व्यायाम करता करताच बेशुद्ध पडला. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी जवळपास ४५ मिनिटं त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र सिद्धांतने अखेरचा श्वास घेतला आणि त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. मृत्यूदरम्यान सिद्धांत ४६ वर्षांचा होता.
सिद्धांतचे मूळ नाव आनंद सूर्यवंशी असे आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने नाव बदलून सिद्धांत वीर सूर्यवंशी केले होते. सिद्धांत टीव्ही इंडस्ट्रीचा ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा आहे. झी टीव्हीवरील ‘ममता’ या मालिकेत त्याने अक्षयची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेने त्याचे प्रेक्षकांशी घट्ट नटे तयार केले होते. कुसुम या मालिकेतून त्याने टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर कृष्णा अर्जुन, कसौटी जिंदगी की, जमीन से आसमां तक, विरुद्ध, भाग्यविधाता, क्या दिल मै है यांसारख्या मालिकेत त्याने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले आहे.
Discussion about this post