हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय कॉमिक शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. कोरोनाच्या प्रलयकारी काळातही हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवत होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक हास्यवीर नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. जसे कि समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात हे आणि असे अनेक कलाकार एकत्र येऊन नुसता कल्ला करतात आणि प्रेक्षकांना आपलं टेन्शन विसरायला भाग पाडतात. या हास्यवीरांपैकी एक ओंकार भोजने याच्या खट्याळ विनोदी स्वभावावर तर प्रेक्षक जीव ओवाळून टाकतात. पण अलीकडेच ओंकारने हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय घेत झी मराठीच्या ‘फु बाई फु’च्या नव्या पर्वाचा भाग होणे पसंत केले. यामुळे त्याचे चाहते आणि इतर प्रेक्षकवर्ग मात्र प्रचंड नाराज झाला आहे.
कॉमिक अभिनेता ओंकार भोजने याचे अगं अगं आई, मी घाबरू घाबरू असे अनेक डायलॉग भारी प्रसिद्ध आहेत. पण आता हे बोलायला हास्यजत्रेत स्वतः ओंकार नाही याची प्रेक्षकांना खंत वाटत आहे. येत्या ३ नोव्हेंबर २०२२ पासून झी मराठीचा लोकप्रिय कॉमिक शो ‘फु बाई फु’ मोठ्या जोमाने पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. त्यामुळे आता कॉमिक शोमध्ये तगडी टक्कर आहे. असे असताना हास्यजत्रेचा हास्य महारथी ओंकार भोजने याने हास्यजत्रेतून एक्झिट घेत थेट ‘फु बाई फु’चा मंच गाठला आहे. त्याचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांना आवडलेला नाही हे व्हायरल प्रोमोवरील कमेंटमधून दिसून आले आहे.
ओंकार या निर्णयावर नाराज चाहत्याने कमेंट करीत लिहिले आहे कि, ‘भाई तू MHJ नाही सोडायला पाहिजे होत. रिस्क घेतलीस तू मोठी.’ तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘का सोडल्यास ओंकार MHJ’.
‘फु बाई फु’च्या आगामी पर्वात एकापेक्षा एक हास्यवीर सहभागी होणार आहेत. यामध्ये शशिकांत केरकर, कमलाकर सातपुते, आशिष पवार, प्राजक्ता हनमघर यासारख्या बऱ्याच दिग्गजांचा समावेश आहे. तर परीक्षक म्हणून कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत आणि उमेश कामत आपल्या भेटीस येणार आहेत.
Discussion about this post