हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा येत्या १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होतो आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच ६ जून २०२३ रोजी ‘आदिपुरुष’ सिनेमाचा अंतिम ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा ट्रेलरमध्ये दमदार ऍक्शन सीन्स आणि VFX ने भरलेला आहे. हा ट्रेलर २ मिनिट २४ सेकंदांचा असून यातील व्हीएफएक्स थोडी निराशा करत असले तरीही कलाकारांचा अभिनय मात्र सिनेमा तारून नेईल असे दिसत आहे.
या ट्रेलरच्या सुरुवातीलाच साधूच्या वेशात रावण सीतेकडे भिक्षा मागायला आलेला दिसतो. अन सीता जशी लक्ष्मणरेषा ओलांडते तसं रावण त्याच्या अघोरी शक्तींनी तिचं हरण करतो. श्रीरामांना हि गोष्ट समजते अन त्यांचा संताप होतो अन सीतेला परत आणण्यासाठी आपण येत असल्याचे ते म्हणतात. हनुमंत श्रीरामांची अंगठी सीतेला देऊ करतो. यावेळी आपल्याला घ्यायला श्रीराम येणार असल्याची सीतेला पूर्ण खात्री असल्याचे ती म्हणते. पुढे वानरसेनेला स्फूर्ती देत श्रीराम रावणाच्या लंकेवर हल्ला करतात. श्रीराम रावणाचा वध करण्यास सज्ज असल्याचे म्हणताना यात दिसतात. अशा महाकाव्य रामायणातील प्रत्येक लहान मोठ्या प्रसंगांचे चित्रीकरण या सिनेमात केले आहे.
‘आदिपुरुष’च्या या अंतिम ट्रेलरमध्ये अजूनही VFX च्या बाबतीत सुधारणा शून्य दिसत आहे. इतके गंडलेले VFX असूनही ट्रेलर ट्रेंडिंगमध्ये आहे. इतकेच काय तर १६ मिलियन व्ह्यूजदेखील मिळाले आहेत. यामध्ये काही ठिकाणी कार्टून स्वरूपात दिसणारी माकडं जरा अतिशयोक्ती वाटत असली तरीही आदिपुरुषचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत असणारी उत्सुकता जशीच्या तशी आहे. मुख्य म्हणजे या सिनेमात साऊथ स्टार अभिनेता प्रभास श्रीरामांच्या भूमिकेत तर बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनॉन सीतेच्या आणि बॉलीवूडचा स्टार अभिनेता सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसतो आहे. सैफ अली खानने साकारलेला रावण प्रेक्षकांच्या उत्सुकतेचे कारण ठरताना दिसतो आहे.
Discussion about this post