हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मिती आणि हॉटशॉट आपच्या माध्यमातून प्रसारण या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी २० जुलै २०२१ रोजी अटक केली. यानंतर तो अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र या दरम्यान शिल्पा शेट्टीला अतिशय मानहानी आणि आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. यानंतर आज पहिल्यांदाच शिल्पाने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची बाजू स्पष्ट आणि सविस्तर व्यक्त केली आहे. दरम्यान, मीडिया ट्रायल न करण्याची तिने विनंती केली आहे. शिवाय माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या खासगीपणाचा आदर करा, अशीही तिने विनंती केली आहे.
My statement. pic.twitter.com/AAHb2STNNh
— SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) August 2, 2021
या पोस्टमध्ये शिल्पा शेट्टी म्हणाली आहे कि, “गेले काही दिवस सर्व स्तरांवर अत्यंत आव्हानात्मक गेले आहेत. अनेक अफवा आणि आरोप सुरू आहेत. माध्यमं आणि हितचिंतकांकडूनही अवास्तव निंदा केली गेली. अनेकांनी ट्रोलिंग केली, प्रश्न उपस्थित केले. आणि हे सर्व केवळ माझीच नव्हे, तर माझ्या कुटुंबाचीही. माझी भूमिका मी अजून मांडली नाही. मी यावर काहीच बोलली नाही. कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे कृपया माझ्या हवाल्यानं कुठलीही असत्य गोष्ट पसरवणं थांबवा. सेलिब्रिटी म्हणून मी मानत असलेलं एक तत्वज्ञान पुन्हा सांगते, ‘कधी तक्रारही करु नका, कधी स्पष्टीकरणही देऊ नका.’
पुढे, मला एवढंच सांगायचंय की, तपास सुरू आहे. मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर मला पूर्ण विश्वास आहे. कुटुंब म्हणून आमच्यासमोर उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर मार्गांचा आम्ही अवलंब करू. पण तोपर्यंत एक आई म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे की, माझ्या मुलांसाठी आमच्या खासगीपणाचा आदर करा. कुठलीही शहानिशा न केलेल्या अर्धवट माहितीवर विश्वास ठेवणं टाळा. कायद्याचा अभिमान बाळगणारी मी स्वाभिमानी भारतीय आहे आणि गेल्या २९ वर्षांपासून मेहनत करणारी महिला आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणी तो विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं, या काळात माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या खासगीपणाच्या अधिकाराचा आदर करा. आमची मीडिया ट्रायल करू नका. कायद्याला त्याचं काम करू द्यावं. सत्यमेव जयते…” अशा प्रकारे शिल्पाने आपली बाजू सर्वांसमोर मांडली आहे.
सध्या राज कुंद्रासोबत त्याचा पार्टनर रायन थार्पही अटकेत आहे. यांना २३ जुलै २०२१ रोजी न्यायालयात हजर केले होते दरम्यान न्यायालयानं दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे येत्या १० ऑगस्ट पर्यंत हे दोघेही कोठडीतच राहणार हे निश्चित.
Discussion about this post