हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता विवेक ओबेरॉय हा बऱ्याच दिवसानंतर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. बॉलिवूडचा अॅक्शन मास्टर रोहित शेट्टीच्या आगामी वेब सिरीजमध्ये विवेक ओबेरॉय महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या वेब सीरिजचे नाव इंडियन पोलीस फोर्स असून लवकरच हि सिरीज रिलीज होणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर विवेकचा लूक चांगलाच गाजताना दिसतो आहे. त्याचा फर्स्ट लूक पाहून चाहते देखील या वेब सिरीजबाबत जास्त उत्सुक झाले आहेत.
अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणारी वेब सिरीज पोलिसांवर आधारित आहे. इतकेच नव्हे तर या वेब सीरिजच्या माध्यमातून रोहित शेट्टी ओटीटी प्लॅटफॉर्मवर म्हणजेच डिजिटल पोर्टलवर पदार्पण करतोय. मात्र अॅक्शनशिवाय रोहित शेट्टीची सिरीज असो वा चित्रपट पूर्ण होणे शक्य नाही हे आपण जाणतोच. त्यामुळे या वेब सिरीजमध्ये १००% अॅक्शन पहायला मिळणार आहे. आपल्या आगामी वेब सिरीज आणि यातील भूमिकेबाबत सांगताना विवेक ओबेरॉयने सोशल मीडियाचा वापर केला आहे.
‘इंडियन पोलीस फोर्स’ या सर्वांत बेस्ट फोर्समध्ये जॉईन होतोय. या भूमिकेसाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल रोहित शेट्टी तुझे आभार’, असं कॅप्शन देत विवेकने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हा फोटो पोस्ट स्वरूपात शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच चाहत्यांनी यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘बऱ्याच वर्षांनी तुला चांगली भूमिका मिळाली’, असं एका युजरने लिहिलं आहे. तर ‘तुला पुन्हा अॅक्शन मोडमध्ये पाहून खूप चांगलं वाटतंय’ असंही एकाने म्हटलं आहे.
या वेब सिरीजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंतर आता विवेक ओबेरॉयने एंट्री केली आहे. हे पाहून प्रेक्षक एकदम खुश झाले आहेत. ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. याआधी सिद्धार्थ आणि शिल्पाचा लूक सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यात आता विवेक ओबेरॉयचा लूकही सामील झाला आहे. “इंडियन पोलीस फोर्स ही सीरिज माझ्यासाठी खूप खास आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी त्यावर काम करतोय. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने यात माझी मदत केली. ही सीरिज नवीन बेंचमार्क स्थापित करेल असा मला पूर्ण विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया रोहित शेट्टीने दिली आहे.
Discussion about this post