हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या घरी विश्रांती घेताना दिसत आहे. रोजचं शेड्युल आणि शूटिंगचा कंटाळा आला म्हणून नव्हे तर पाय मोडलाय म्हणून शिल्पा घरात बसली आहे. बॉलिवूडचा ऍक्शन दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या कॅप्स वेब सीरिजचे शूट करत असताना शिल्पाचा अपघात झाला होता. या अपघातात शिल्पाचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्यामुळे सध्या ती सक्तीची विश्रांती घेत आहे. पण शिल्पा फिटनेसच्या बाबतीत अजिबात हयगय करत नाही. पायाला फ्रॅक्चर असतानाही मॅडम खुर्चीत बसून स्ट्रेचिंग करताना दिसत आहे. तिने स्वतःच एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना स्ट्रेचिंगसाठी प्रोत्साहित केले आहे.
शिल्पा शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘१० दिवसांच्या विश्रांतीनंतर, मला समजले… स्ट्रेचिंग न करण्यासाठी कोणतेही कारण पुरेसे नाही. त्यामुळे, दुखापतीला काही आठवडे सहज स्वीकारण्याची गरज असली तरी, निष्क्रियता तुम्हाला बुरसटलेले बनवू शकते… म्हणून… मी पर्वतासनाचा सराव करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उत्तरिता पार्श्वकोनासन आणि भारद्वाजासनाने समारोप केला. ज्याला जमिनीवर बसता येत नाही किंवा गुडघेदुखी, पाठदुखीचा त्रास होत असेल तो खुर्चीवर बसून हे स्ट्रेच करू शकतो.’
‘ही आसने पाठीचा कणा आणि पाठीच्या स्नायूंची लवचिकता मजबूत आणि सुधारण्यासाठी फायदेशीर आहेत आणि पचनसंस्थेसाठी देखील उपयुक्त आहेत. तथापि, गरोदरपणात तिसरे आसन ‘भारद्वाजसन (ट्विस्टिंग पोझ)’ टाळावे. आपल्या नित्यक्रमात काहीही अडथळा येऊ देऊ नका. तुम्ही करू शकता यावर विश्वास ठेवून आणि गोष्टी बदलण्याची इच्छा बाळगून तुम्ही सर्वात मोठ्या अडथळ्यांवर मात करू शकता.’
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या कामाच्या बाबतीत आणि फिटनेसच्या बाबतीत फार सख्त आहे. फिटनेस राखण्यासाठी शिल्पा नियमित विविध व्यायामाचे प्रकार करताना दिसते. इतकेच काय तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना फिटनेस राखण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसते. अनेकदा व्यायाम करतानाचे व्हिडीओ ती सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करत असते. शिवाय तिची चिमुकली लेकसुद्धा तिच्यासोबत फिटनेसचे धडे गिरवताना दिसते. सध्या शिल्पाची हिम्मत आणि निश्चयी स्वभाव पाहून लोक तिचे कौतुक करत आहेत.
Discussion about this post