हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीसह लहान मुलांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या बहारदार गीतांचा नजराणा घेऊन आलेले सलील – संदीप हि जोडी अत्यंत लोकप्रिय गीतकार संगीतकाराची जोडी आहे. त्यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम अतिशय प्रसिद्ध आणि तितकाच प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम आहे. यामुळे आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचा कुठलाच शो कधीच रिकामी गेला नाही. यावेळी ठाण्यात लवकरच ‘आयुष्यावर बोलू काही’ हा बहुचर्चित कार्यक्रम होणार आहे. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे. त्यामुळे मंत्रमुग्ध व्हायला तयार व्हा!
सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्यासह सुप्रसिद्ध कवी संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये येत्या २४ जुलै २०२२ रोजी सादर होणार आहे. विशेष म्हणजे रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामुल्य असल्यामुळे प्रेक्षकांची झुंबड उडणार हे नक्की. स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान ठाणे आणि विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठान आयोजित तसेच एकदंत थिएटर्स सह- आयोजित हा कार्यक्रम असणार आहे. शिवाय या कार्यक्रमाचे डिजिटल पार्टनर स्मृतिगंध आहेत.
‘जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही,
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’…,
‘दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई,
नीज दाटली डोळ्यात, तरी घरी कुणी नाही’…
‘कोमेजून निजलेली एक परी राणी,
उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी…
‘नसतेस घरी तू जेव्हा , जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे, अंधार फाटका होतो.. ‘
हि आणि अशी अनेक बहारदार ‘आयुष्यावर बोलू काही’ या अल्बमच्या माध्यमातून मनामनांत घर करून बसलेली गाणी या कार्यक्रमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. त्यामुळे येत्या २४ जुलै २०२२ रोजी ठाणे, गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वाजता जायला विसरू नका. मुख्य म्हणजे डॉ. सलील कुलकर्णी यांचा आगामी चित्रपटात ‘एकदा काय झालं’ यातील काही कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या चित्रपटात उर्मिला कानिटकर- कोठारे, सुमीत राघवन, अर्जुन पूर्णपात्रे, मोहन आगाशे, सुहास जोशी अशी तगडी स्टारकास्ट आहे.
Discussion about this post