हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच ५ मे रोजी या चित्रपटाचे प्रदर्शन झाले आणि चित्रपटावरील वाद आणखीच उफाळला. हा चित्रपट धर्मांतर अन लव्ह जिहादसारख्या घटनांवर थेट भाष्य करतो आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर अनेक ठिकाणी बंदी आणण्याची मागणी केली गेली असून काही राज्यांमध्ये हा चित्रपट बॅन करण्यात आला आहे. अशातच धर्मांतरापासून हिंदू मुलींना वाचवण्याचे आवाहन करत भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून धर्मांतराच्या घटनेवर आधारित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे पिंपरी- चिंचवड येथे ३ शो मोफत दाखवण्यात येणार आहेत. चिंचवडमधील सिटी वन मॉलमधील पी.व्ही.आर. चित्रपटगृहात ११ मे रोजी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या मोफत शोचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत बोलताना आमदार महेश लांडगे यांनी सांगितले कि, ‘धर्मांतर, लव्ह जिहाद यासारख्या घटना सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक होत आहेत. याबाबत जाणीव आणि जागृती व्हावी. माता- भगिनी अशा वृत्तीपासून दूर राहाव्यात, अशी आमची भावना आहे. राज्य सरकारने धर्मांतर, लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा, अशी मागणीही आम्ही विधानसभा अधिवेशनात केली होती’.
सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी या अभिनेत्री मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटावर सुरु चर्चांकडे लक्ष न देता एक वेगळी आणि स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहिल्यास चित्रपटातील वास्तव हृदयाला हात घालताना दिसत आहे. या चित्रपटात लव्ह जिहादचा विषय अत्यंत प्रखर मांडला आहे. परधर्मातील मुलींना फूस लावून प्रेमात पाडायचे आणि मग त्यांना दहशतवादी बनवायचे, अशी दहशतवादी संघटनेची योजना असते. जी पूर्ण करण्यासाठी देशात ठिकठिकाणी काही मुली आणि मुलांना नियुक्त केलेले असते. या मुली कॉलेजमधील तरुणींचे ब्रेन वॉश करून त्यांना औषधाच्या रुपात ड्रग्ज देऊन मुस्लिम संस्कृतीबाबत माहिती देतात आणि त्यांचे धर्म परिवर्तन करतात. तसेच काही देखणे तरुण या तरुणींना प्रेमात प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि नंतर त्यांचे आयुष्य उध्वस्त करतात, अशी या चित्रपटांची एकंदर कथा आहे.
Discussion about this post