हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट सह्याद्रीचा सिंह.. जना मनातला आवाज.. आणि मातीतला अस्सल लोककलावंत स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे संगीताची एक अनोखी पर्वणी आहे.
चित्रपटाची पहिली झलक, पहिलं पोस्टर ते पहिलं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. अशातच आता भजन- कीर्तन- भारुड- ओव्यांमध्ये रमणाऱ्या लहानगा किसना आपल्या भेटीस आला आहे. ‘नको गाऊ नको किसना’ या नव्या गाण्याने सोशल मीडियावर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळवला आहे.
या गाण्यामध्ये आपल्याला शाहिरांचं बालपण अनुभवायला मिळणार आहे. आईच्या धाकाला घाबरून गाणं कसं सोडणार..? त्यामुळे कोवळ्या वयात दोन्ही बाजू तारणारा किसना या गाण्यातून आपले लक्ष वेधून घेतोय. आपल्या अनोख्या ढंगात हे गाणं गाताना किसनासोबत त्याचे सवंगडीसुद्धा आहेत. किसनाची आई आली आहे हे पाहताच त्याचे मित्र ‘गाऊ नको किसना’ असे म्हणताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर हे गाणं चांगलंच ट्रेंडिंगमध्ये आले आहे. या गाण्याचे संगीत महाराष्ट्राची लाडकी जोडी अजय- अतुल यांनी दिले आहे. तर शाळेच्या वर्गात खणखणीत स्वरात चंद्रा गाणाऱ्या जयेश खरेचा आवाज या गाण्याला लाभला आहे. या गाण्याचे हे सुंदर बोल गुरु ठाकूर यांनी रचले आहेत आणि नृत्य दिग्दर्शन हे पॉल मार्शल यांचे.
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्स यांची आहे. तर चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे हे आहेत. या चित्रपटाला अजय आणि अतुल या महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचे मंत्रमुग्ध करणारे संगीत लाभले आहे. याशिवाय चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा बहुचर्चित चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. तूर्तास चित्रपटातील गाणी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यास यशस्वी झाली आहेत.
Discussion about this post