हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या शुक्रवारी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा एकत्र पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव ‘वेड’. हा चित्रपट तेलगू चित्रपट मजिलीचा मराठी रिमेक असला तरीही या कथानकाला आवश्यकता होती ती उत्तम अभिनयाच्या जोडीची. जी या कलाकारांनी दिली. रितेश, जिनिलिया यांच्यासह अशोक सराफ आणि विद्याधर जोशी या दिग्गज कलाकारांनी देखील आपल्या भूमिका अव्वल वठवल्या.
पण तरीही कुठेतरी किंचितभर जास्त जिनिलियाच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. एकतर मराठी शिकत असतानादेखील तिने केलेले शब्द प्रयोग आणि उच्चारण नॉन मराठी वाटत नाहीत आणि तिच्या चेहऱ्यावरहील हावभाव मन जिंकून जातात. त्यामुळे जिनिलियाने साकारलेल्या श्रावणीवर प्रेक्षक प्रेम करताना दिसत आहेत.
या प्रेमासाठी आणि या प्रतिसादासाठी जिनिलियानाने चाहत्यांचे आभार मानले आहेत. याकरिता तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांनी वेड चित्रपटाला दिलेला प्रतिसाद कसा आहे ते आपण पाहू शकतो. जिनिलियाने या व्हिडीओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘रिक्षातून भर पावसात तिचा उजवा पाय बाहेर पडतो. ती छत्री उघडते आणि पहिल्यांदा पडद्यावर दिसते. ‘श्रावणी’चं टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही स्वागत केलं. पण ते माझं ही मराठी चित्रपट जगातलं पहिलं पाऊल होतं. तुम्ही श्रावणीला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.’
जिनिलियाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. जिनिलियाचा एक अभिनेत्री म्हणून प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. शिवाय वेड या चित्रपटातून तिने मराठी सिने विश्वात पदार्पण केले असल्यामुळे चाहत्यांसाठीदेखील हा चित्रपट खास ठरला. आतापर्यंत या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली असून सोशल मीडियावर चित्रपटातील गाणी तुफान ट्रेंडिंगमध्ये आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी हि गाणी संगीतबद्ध केली आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन रितेशनं केले असून चित्रपटाची निर्मिती जिनिलियाने केली आहे. तूर्तास या चित्रपटाबद्दल एव्हढंडच म्हणता येईल कि, ‘वेड लावलंय’.
Discussion about this post