हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकालची मुलं मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप याशिवाय दुसरं काही पाहतच नाहीत, अशी अनेक पालकांची तक्रार असते. म्हणा हि तक्रार काही चूक नाही. पण यासाठी काय करायचं..? या प्रश्नाचं काय करायचं..? आजकाल तर मुलांचा अभ्यास सुद्धा मोबाईलवरच होतो. यामुळे मुलं मैदानी खेळ सोडाच, घरातील सदस्यांशी देखील धड बोलत नाहीत. ज्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही. म्हणून अनघा विजू माने या लहानग्या दोस्तांसाठी रंगभूमीवर खास भेट घेऊन येत आहेत. ‘GHOST एका जंगलाची’ या बालनाट्याच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या बालपणात घेऊन जाण्यासाठी संपूर्ण टीम सज्ज आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग येत्या २५ डिसेंबर रोजी, रात्री ८ वाजता, श्री शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहे. अनघा या प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांच्या पत्नी आहेत आणि म्हणून विजू यांनी एक खास पोस्ट शेअर करत या बालनाट्यामागील किस्सा सांगितला आहे.
विजू माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘आपण इथून आत सात पावलं चालू. आशीर्वाद द्यायला ही आपली नवी वास्तू आहे. पावलागणिक ती ‘तथास्तु’ म्हणत राहील. तुझ्या दादांची साधना तुझ्या पाठीशी आहे. मरताना दिलेला बाबांचा आशीर्वाद मलाही सावरील… वपुंचं हे पत्र मी अनुला लग्नाआधी अत्यंत गांभीर्याने वाचून दाखवलं होतं. जणू काही मी पुढे जाऊन होणाऱ्या बायकोशी काय हितगुज करावं हे वपुंनी खूप आधीच लिहून ठेवलं होतं.
सौंदर्य, संगीत, सुगंध, साहित्य ह्या सर्वांसाठी मी बेभान होतो. पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे ह्याचा मला अभिमान वाटतो. मला परमेश्वर व्हायचं नाही. नवऱ्याला देव वगैरे मानणाऱ्यांपैकी तू आहेस की नाहीस हे मी परिचय होऊनही विचारलं नाही. तशी नसलीस तर उत्तमच, पण असलीस तर इतकंच सांगेन की मला देव मानायचा प्रयत्न केलास तर तो माझ्यावर फार मोठा अन्याय होईल.’
‘ह्याच संदर्भाचं काहीतरी आयुष्यात घडतंय. तिने तोईची स्वतःची निर्मिती संस्था स्थापन केलीय. त्यात मी अज्जिबात लुडबुड करणार नाही हे आमचं ठरलं होतं. वपुंच्या वरच्या वाक्यांना पुढे घेऊन जायचं तर मी त्यांची क्षमा मागून पुढे म्हणेन… मला देव मानायचा प्रयत्न केलास तर तो माझ्यावर फार मोठा अन्याय होईल…. माझ्या पावलावर पाऊल नको, माझ्या पावला’सोबत’ पाऊल ठेवलेलं जास्त आवडेल मला. ह्या न्यायाने अनुची पहिली नाटक निर्मिती “बालनाट्य” आहे. मागे आमचा एकदा विषय झाला होता. बालनाट्य जगलं तर पुढे मराठी नाटक जगेल, ती एवढ मनावर घेईल असं वाटलं नव्हतं. असो. मित्रहो, तुमच्या शुभेच्छा आणि प्रत्यक्ष उपस्थिती हुरूप वाढवेल. हा प्रोमो बघा. आवडला तर ताबडतोब शेयर करा.’
Discussion about this post