हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीतील अनेक कलाकार अभिनयासह सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. त्यांच्या अभिनयाला जितकी पसंती मिळते त्याहून कदाचित थोडी अधिक प्रसिद्धी आणि प्रेम या कलाकार मंडळींना समाजकार्यातून मिळत असतं. यात केवळ बॉलिवूडच नव्हे तर कित्येक मराठी कलाकारदेखील आपापल्या परीने सामाजिक कार्य करत आहेत. कोरोना काळात याचे अत्याधिक दाखले मिळाले आहेत. अनेक कलाकार गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. शक्य तितकी आणि जमेल तशी मदत करण्यासाठी जो तो मैदानात उतरला आहे. इतर कलाकरांप्रमाणे प्राजक्ता माळीदेखील गेल्या काही महिन्यापासून मदत कार्य करताना दिसत आहे. नुकताच तिने चाहत्यांकडे मदतीचा हात मागितला आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असते. आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते आगामी प्रोजेक्टपर्यंत ती सर्व माहिती आपल्या फॅन्ससह शेअर करत आहे. कोरोना काळात ती जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर इतरांच्या मदतीसाठी करताना दिसली. तेव्हापासून आजही तिचे मदतकार्य सुरुच आहे. आता पुन्हा एकदा प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांकडे मदतीसाठी पुकार लगावली आहे. ‘आमचं घर’ ही एक सामाजिक संस्था आहे, जी ठाण्यात राहणाऱ्या गरीब बांधवांसाठी, मुलांसाठी आणि ज्या वृद्धांना कोणी आधार नाही त्यांच्यासाठी काम करते. मात्र गेल्या काही काळापासून या संस्थेला स्वतःलाच मदतीची गरज भासू लागली आहे आणि याच संस्थेसाठी प्राजक्ताने चाहत्यांकडे मदतीचा हात मागितला आहे.
‘आमचं घर’ हि संस्था गेल्या काही दिवसांपासून अतिशय आर्थिक दृष्ट्या संकटात आहे. कोरोना महामारीच्या कठिण काळात त्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे या संस्थेला मदत करण्यासाठी प्राजक्ता माळी पुढे सरसावली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपल्या चाहत्यांना या संस्थेला मदत करण्यासाठीचे आवाहन केले आहे. ‘आमचं घरला मदतीचे हात द्या’ असे आवाहन प्राजक्ता माळीने एका व्हिडिओतून केले आहे. प्राजक्ताचा हा व्हिडीओ पाहून चाहतेही तिला या संस्थेसाठी मदत करणार असल्याचे आश्वासन देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Discussion about this post