हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान हा चित्रपट ज्या नदीशी जोडलेल्या जीवनकथेवर आधारित आहे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक होते. म्हणूनच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नाशिकमध्ये पुन्हा एकदा हजेरी लावत कुसुमाग्रज स्मारक येथे दीपप्रज्वलन केले. शिवाय ‘गोदावरी’च्या टीमने पंचवटी येथे ‘गोदावरी’ नदीची महाआरतीही केली. या वेळी जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, संजय मोने, लेखक प्राजक्त देशमुख, दिग्दर्शक निखिल महाजन, जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंट हेड निखिल साने आदी मान्यवर उपस्थित होते.
या चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, ‘राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर आता ‘गोदावरी’ आपल्या घरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. हा एक भावनिक आणि कौटुंबिक चित्रपट आहे, जो मनाच्या खोलवर जाणारा आहे. अनेकदा असं होत की, एखादी गोष्ट साध्य करण्याच्या नादात आपण अनेक जवळच्या गोष्टी, नाती मागे सोडतो आणि त्याच मौल्यवान नात्यांची किंमत जाणवून देणारा हा चित्रपट आहे. नात्यांचे महत्व अधोरेखित करणारा ‘गोदावरी’ संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याने आमचे कुटुंब पुन्हा एकदा खळाळत्या नदीसाठी, नदीकाठी भेटलो आहोत.’
‘गोदावरी’ चित्रपटाबद्दल बोलताना जितेंद्र जोशी म्हणतो कि, ’गोदावरीच्या निमित्ताने मी एक नवी सुरूवात करतो आहे. कारण ‘गोदावरी’ हे निर्मिती क्षेत्रातील माझं पहिलं पाऊल असणार आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा नाशिकला येऊन ‘गोदावरी’नदीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने आमचे ‘गोदावरी’चे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले. इथल्या गल्लीतून फिरताना पुन्हा चित्रीकरणाच्या त्या भावनिक आठवणी ताज्या झाल्या. नाशिकसोबत आता एक घट्ट नातं निर्माण झालं आहे. विशेषतः गोदावरीसोबत. प्रत्येक कुटुंबाला जोडणारा हा चित्रपट असून आयुष्यात कुटुंब, नाती किती महत्वाची असतात, याची नव्याने ओळख करून देणारी ही गोष्ट आहे.’
Discussion about this post