हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा हे नेहमीच त्यांच्या केमिस्ट्रीमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण यावेळी एक वेगळ्याच कारणामुळे गोविंदाची पत्नी चर्चेचा विषय ठरली आहे. अलीकडेच सुनीता अहुजा यांनी उज्जैनमधील महाकाल महादेवाचे दर्शन घेतले. सुनीता महाकाल मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांचे अनेक फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण यातील एका फोटोमुळे नेटकऱ्यांनी मंदिर प्रशासनावर टीकांचा भडीमार केला आहे.
दिनांक १५ मे २०२३ रोजी अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा उज्जैन येथे महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. सुनीता यांचे मंदिरातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोत महाकाल महादेवाची पूजा करताना सुनीता यांच्या हातात एक छोटी पर्स दिसतेय. महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात कुणालाही बॅग किंवा इतर वस्तू घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. पण मंदिर समितीतील कोणत्याही सदस्याने सुनीता यांच्या पर्स घेऊन गाभाऱ्यात जाण्यावर आक्षेप घेतला नाही. सुनीता यांच्याजागी कुणी सामान्य व्यक्ती असती तर..? असा सवाल उठवीत नेटकऱ्यांनी मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
इतकेच नव्हे तर सुनीता अहुजा याना सेलिब्रिटी म्हणून दिली जाणारी व्हिआयपी ट्रीटमेंट पाहून नेटकऱ्यांनी मंदिर प्रशासनावर टीकांचा वर्षाव केला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी मंदिर प्रशासनाकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे असे म्हटले जात आहे. महाकाल मंदिराचे व्यवस्थापक संदीप सोनी यांनी सांगितले आहे कि, ‘आमची सुरक्षा रक्षकांची टीम त्या ठिकाणी होती. त्यामुळे त्यांनी मंदिरात जाणाऱ्या प्रत्येकाच्या सामानाची तपासणी करायला हवी होती. कुणीही बॅग किंवा पर्स मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन जाणार नाही, याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं होतं. त्यामुळे ज्यांनी कामात हलगर्जीपणा केलाय, त्यांच्यावर कारवाई ही होणारच’.
Discussion about this post