हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गुरु आणि शिष्य हे नाते काहीसे वेगळे असते. गुरु आपल्या शिष्यासाठी कधी कठोर होतात तर कधी मायेची सावली होऊन पांघरून घालतात. अशीच एक राजकीय क्षेत्रातील गुरु शिष्याची जोडी उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. हि जोडी म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिष्य ठाण्याचा वाघ आनंदराव दिघे. सामाजिक असो वा राजकीय क्षेत्र दिघेंनी नेहमीच आपले गुरु बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल केली आहे. त्यांचे नाते हे जगाच्या कोणत्याही नियमापार होते. आज हि दोन्ही व्यक्तिमत्व हयात नाहीत मात्र त्यांच्या नात्याची वीण आजही घट्ट आहे. नुकतेच दिघेंच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटातील गुरुपौर्णिमा हे गाणे प्रदर्शित झाले आहे. यातून आपल्या गुरु शिष्य कसे असावे याची एक झलक पहायला मिळेल.
‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘गुरुपौर्णिमा’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही तर शिष्याचा दिवस आहे’ असे आनंद दिघे मानायचे आणि याची प्रचिती या गाण्यातून येईल. या दिवशी गुरुची सेवा केली की पदरी पुण्य पडतं अशी दिघेंची निर्माण श्रद्धा होती. आनंद दिघे यांची बाळासाहेबांप्रती असणारी श्रद्धा आणि निष्ठा थोर होती. म्हणूनच हे गाणे पाहताना अनेकांचे डोळे पाणावले. गाण्यातील ठेव, बोल आणि कलाकारांनी प्रकट केलेल्या भावनांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.
‘गुरुपौर्णिमा’ या गाण्याला संगीता बर्वे यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्याला अविनाश- विश्वजीत या जोडीने संगीतबद्ध केले आहे. तसेच मनिष राजगिरे यांचा कर्णमधुर आवाज या गाण्याला लाभला आहे. भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी तस्वीर आणि त्या पुढ्यात खुर्चीवर बसलेले बाळासाहेब. तर त्यांच्या चरणी बसलेले आनंद दिघे हे सर्व दृश्य डोळ्यांत साठवावे असे आहे. आनंद दिघे करारी होते पण त्यांच्यात दडलेला हळवा शिष्य जेव्हा गुरुसमोर नतमस्तक झाला तेव्हाची भावना अत्यंत कंठ दाटवणारी आहे. धर्मवीरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये यांनी साकारली आहे. या गाण्यातून प्रथमच या व्यक्तिरेखेची झलक पहायला मिळाली आहे.
Discussion about this post