हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला विजेता म्हणजेच अभिनव बिंद्रा. गेल्या बऱ्याच काळापासून अभिनव बिंद्राच्या बायोपिकबाबत केवळ चर्चा कानी येत होती. तशी या चित्रपटाची घोषणा होऊनदेखील मधला बराच काळ लोटला आहे. साधारण पाच वर्षांपूर्वी हा बायोपिक बनविला जाणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र सतत काही ना काही कारणांमुळे हा चित्रपट चांगलाच रखडला. मात्र आता या सगळ्या चर्चांना अखेरचा पूर्ण विराम मिळाला असून या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने मीडियाशी संवाद साधला आहे. अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये अभिनेता हर्षवर्धन कपूर त्याची भूमिका साकारणार आहे.
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचा लेक हर्षवर्धन कपूर या बायोपिक चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणार आहे. दरम्यान मीडियाशी संवाद साधताना त्याला या बायोपिक चित्रपटाच्या शुटिंगविषयी आणि आतील गाभ्याविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यावर तो म्हणाला कि, ‘मला वाटते की तुम्ही माझ्या वडिलांना चित्रपटाबद्दल विचारले पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तेच उत्तम व्यक्ती आहे. कारण, तेच या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. आम्ही निश्चितपणे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटाचे चित्रीकरण करू. कारण या चित्रपटासाठी खूप तयारीची आवश्यकता आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर आम्ही थारच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो. तसा त्याच्या आधीच हा चित्रपट व्हायला हवा होता. पण आम्ही पुढे गेलो आणि मध्यंतरीच्या काळात आम्ही दोन चित्रपट बनवले. या सगळ्यात आम्ही अभिनव बिंद्रा यांची बायोपिक सुरू करू शकलो नाही. ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि आता ती पूर्ण करायची वेळ आली आहे.’
पुढे म्हणाला कि, ‘याबाबत मुख्य सांगायचे म्हणजे मोठ्या पडद्यावर एखाद्या वास्तविक जीवनातील व्यक्तीची भूमिका करणे फार मोठे आव्हान आहे. कारण खऱ्या आयुष्यात खरा खेळाडू होण्यासाठी त्यांनी आयुष्यातील १५ ते २० वर्ष असा मोठा कालावधी दिलेला असतो. कदाचित या पेक्षाही जास्त कालावधी ते देत असतील. त्यामुळे अशा भूमिकांना तंतोतंत सादर करण्यासाठी विशेष अशी खूप मेहनत घ्यावी लागते. जी आम्ही घेत आहोत. थारसारख्या प्रोजेक्टसाठी आम्ही राजस्थानला जाऊन दोन महिने चित्रीकरण केले आणि ते एकाच वेळी पूर्णसुद्धा केले. त्याचप्रमाणे आम्ही मुंबईतसुद्धा २० दिवसांत शूटिंग केले. परंतु, हा बायोपिक चित्रपट असून खूप मोठा आहे. त्यामुळे याचे चित्रीकरण एक विशेष जबाबदारी आणि बारकाईने काम आहे.
Discussion about this post