हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात अर्थात अमृत महोत्सवी वर्षात ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १९ मार्च २०२३ रोजी जमशेद भाभा थिएटर, एन सी पी ए येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात आपल्या मातृभूमीच्या गौरवाची अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बॉलिवूडची ड्रीमगर्ल अर्थात सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तिका हेमा मालिनी ‘गंगा’ ही नृत्यनाटिका सादर करणार आहेत.
अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र सरकारने सर्व राज्यांतील ७५ नद्या स्वच्छ आणि पुनरुज्जीवित करण्याची योजना आखली आहे. या निमित्त गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर झालेले अवतरण हेमा मालिनी यांच्या नृत्य नाटिकेतून पाहण्याची संधी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच विविध प्रदेशातून गंगा नदीचा होणारा प्रवास यामध्ये दाखवला जाईल. युगानुयुगे वाहणारी पाप नाशिनी गंगा नदी आजच्या कलियुगात दुर्लक्षित आणि उद्ध्वस्त अवस्थेत असल्याने तिची व्यथा या नाटिकेत मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हि नाटिका १९ मार्च २०२३ रोजी कार्यक्रमात संध्याकाळी ६. ३० वाजता सादर केली जाणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता आणि निर्मिती हेमा मालिनी यांनी केली असून संगीत पद्मश्री रवींद्र जैन, आशित देसाई आणि आलाप देसाई यांचे आहे.
या नाटिकेबाबत बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या कि, ‘आजच्या तरुण पिढीला नद्यांशी जोडणे आणि नद्यांची काळजी घेण्यास प्रवृत्त करणे, असे उदात्त ध्येय असणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या या उदात्त उपक्रमात सहभागी होताना मला अभिमान वाटतो. ‘चलीये, जानिये नदी को.’ या अभियानातील माझे योगदान म्हणजे ‘गंगा ‘ हे चांगले संशोधन केलेले आणि कौशल्यपूर्ण नृत्य सादरीकरण सादर करणे. हे नृत्यनाट्य आम्हा सर्वांना आमच्या नद्यांची काळजी घेण्यासाठी आणि एकत्रित मानवी प्रयत्नांद्वारे त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रेरणा देईल, अशी मला आशा आहे’.
या नाटिकेचे नृत्य दिग्दर्शन भूषण लकांद्री यांचे आणि वेशभूषा नीता लुल्ला, सल्लागार देवदत्त पट्टनायक संशोधन राम गोविंद यांचे आहे. याशिवाय संवाद आणि गीत पद्मश्री रवींद्र जैन आणि शेखर अस्तित्व पार्श्वगायक सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन, मिका सिंग आणि रेखा राव यांचे आहे.
Discussion about this post