हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध विषयांवर बेधडक बोलणारी, व्यक्त होणारी आणि लेखणीला धार देऊन टोकदार शब्द लिहिणारी अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच चर्चेत असते. विविध नाटकं, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून हेमांगीने आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. अभिनयासोबतच परखड बोलणे आणि पुरोगामी विचार मांडणे यासाठी हेमांगी विशेष ओळखली जाते. या सवयींमुळे ती बऱ्याचदा ट्रोल झाली आहे. पण तरीही ती थांबली नाही. आज हेमांगी पुन्हा चर्चेत आहे आणि त्याचे कारण ठरल्या आहेत गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणजेच आपल्या लाडक्या लता दीदी. आज त्यांची जयंती आहे आणि या निमित्ताने हेमांगीने तिचे लता दीदींसोबत जुळलेले एक खास नाते सांगितले आहे.
या पोस्ट मध्ये ती म्हणते, ‘मला जर कुणी विचारलं दैवी म्हणजे काय तर मी म्हणेन,’हा आवाज’..जादू म्हणजे काय तर हा आवाज, निखळ, नितळ, तरल म्हणजे काय तर हा आवाज, शाश्वत म्हणजे काय तर हा आवाज! आमचं भाग्य ज्या शतकात हा आवाज जन्माला आला त्याच शतकात, काळात आम्ही जन्माला आलो! धन्य धन्य झालो आम्ही! आपण लहान माणसं अश्या महान व्यक्तींशी काही न काही साम्य जोडत असतो. आवाजाची साम्यता जोडायला मला १० जन्म घ्यावे लागतील पण तुमचं पहिलं आणि खरं नाव ‘हेमा’ आहे कळल्यावर मला किती किती धन्य वाटलं होतं काय, कसं सांगू…? हेमा/ लता मंगेशकर वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!”
अभिनेत्री हेमांगी कवीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लता दीदींचा अतिशय जुना तारुण्यातील एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. तिची हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. आज जगभरातून अनेकांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मनोरंजन विश्वातूनही अनेकांनी त्यांच्या स्मृती जागवल्या.
Discussion about this post