हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार…’ म्हणत सोशल मीडियावर ‘चौक’ चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. आधी पोस्टर, मग टिझर आणि आता ट्रेलर रिलीज झाल्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढीस लागली आहे. नुकताच ‘चौक’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. चित्रपटातील कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा दणक्यात पार पडला.
यावेळी ‘चौक’ चित्रपटातील कलाकारांसोबत सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे, अभिनेता प्रसाद ओक, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्य म्हणजे या सोहळ्याला हिंदुस्थानी भाऊची विशेष उपस्थिती लाभली आणि त्याच्याच हस्ते ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी प्रत्येकाचं लक्ष स्क्रीनवर होतं.
चौकचा ट्रेलर लॉन्च सोहळा दणक्यात पार पडला. या कार्यक्रमादम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांनी देवेंद्र गायकवाड यांचे ‘डिरेक्टर्स क्लब’मध्ये वेलकम करणारा एक व्हिडिओ सादर करण्यात आला. शिवाय या चित्रपटातील मुख्य कलाकारांनी त्यांचं आणि चौकाचं नातं सांगितलं. यावेळी हिंदुस्थानी भाऊ, प्रविण तरडे, संजय जाधव, चित्रपट निर्माते दिलीप पाटील यांच्या हस्ते ट्रेलर लॉन्च करण्यात आला. याक्षणी हिंदुस्थानी भाऊ याने आपले मत व्यक्त करत म्हटले कि, ‘मराठी चित्रपट हरवला होता, पण पुन्हा एकदा मराठी चित्रपटाला उंचीवर आणण्याचं काम या लोकांनी केलं आहे. मी छोट्याशा चौकातून आज देशातल्या प्रत्येक चौकात प्रेम कमावलं आहे. तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं कमावली. मी चौकातूनचं मोठा झालोय. चौकात राहणार माणूस कधीच छोटा नसतो. कोरोनाच्या काळात चौकातली उनाड पोरं मदतीला धावली पण बंगल्यातून कुणी उतरलं नाही. चौकाचं महत्व खूप मोठं आहे’.
या मल्टिस्टारर चित्रपटात अनुभवी कलाकारमंडळी, नव्या पिढीतील हरहुन्नरी कलाकार यांचा मिलाप पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे वास्तववादी चित्रण, संवाद हि चित्रपटाची जमेची बाजू आहे, असे ट्रेलरवरून लक्षात येत आहे. सोबतच संगीतकार साई- पियुषचं थरारक पार्श्व संगीत चित्रपटाला आणखी रोमांचक बनवत आहे. या चित्रपटाचे टायटल देखील ‘चौक’ आहे आणि विषयसुद्धा ‘चौक’ आहे.त्यामुळे चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता काही औरच आहे. या चित्रपटात प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, अक्षय टंकसाळे, संस्कृती बालगुडे, स्नेहल तरडे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर, सुरेश विश्वकर्मा, बालकलाकार अरित्रा देवेंद्र गायकवाड अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहेत. शिवाय दिग्दर्शक देवेंद्र अरूण गायकवाड यांची चित्रपटातील विशेष भूमिका आपले लक्ष वेधून घेताना दिसणार आहे.
Discussion about this post