हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजच्या युगातील महिला सक्षम आहेत. आपल्या पायावर उभ्या आहेत आणि मुख्य म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून भिडताना दिसत आहेत. पूर्वी चूल आणि मूल यात स्त्रिया अडकलेल्या होत्या. पण आज महिला आपल्या कर्तृत्वाने उंच भरारी घेत आहे. आज्जी, आई, ताई, काकी, मावशी, आत्या आपल्या आयुष्यात असणाऱ्या या सगळ्याच स्त्रिया खूप महत्वाच्या आहेत. या स्त्रिया आपल्याला घडवत असताना एक समाज घडवत असतात. म्हणूनच स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी वर्षभरातून एक दिवस ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो. यंदा हा दिवस आपण हिरकणीसोबत साजरा करणार आहोत.
‘जागतिक महिला दिन’ हा दिवस दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. यंदाही हा दिवस तितक्याच आनंदाने साजरा केला जाणार आहे. दरवर्षी ३ मार्च ते ८ मार्च असा ‘महिला दिन सप्ताह’ साजरा केला जातो. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा हा सोहळा रुपेरी पडद्यावरदेखील साजरा केला जाणार आहे. आपल्या तान्ह्या बाळाच्या ओढीने जीवाची पर्वा न करता अख्खा गड सरसर उतरणारी ‘हिरकणी’ तुम्हाला माहित नसेल तर नवलंच! ‘हिरकणी’ची कथा आणि व्यथा सांगणारा चित्रपट दिग्दर्शक प्रसाद ओक याने तयार केला होता आणि हाच चित्रपट यंदा महिला दिनाचा सप्ताह गाजवणार आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला ‘हिरकणी’ हा चित्रपट २४ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. शाळेच्या पाठ्यपुस्तकात वाचलेली हिरकणी कविता ते चित्रपट हा प्रवास सर्वांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा करून गेला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. हि हिरकणी केवळ एक स्त्री नव्हती तर ती एक आई होती. हिरकणीने आपल्या बाळासाठी फक्त गड उतरला नाही, तर सर्व मर्यादा तोडून तिने ध्येय गाठले. हि गोष्ट एका आईची आहे. हि गोष्ट त्या हिरकणीची आहे. हि हिरकणी आपल्याला ‘महिला दिना’च्या निमित्ताने पुन्हा एकदा थिएटरमध्ये भेटीस येत आहे. मातृत्वाची ही अजरामर गाथा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपण पाहू शकणार आहोत. सोनाली कुलकर्णीने या चित्रपटाच्या शोची माहिती सोशल मीडियावर पुरवली आहे.
Discussion about this post