हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरातील विषयांवर परखड वक्तव्य करणारा मराठमोळा अभिनेता आस्ताद काळे हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्यामुळे त्याने लिहिलेली अशी एकही पोस्ट नसते जी चर्चेत नसेल. एकतर कोणत्याही विषयावर आपले मुद्दे आणि आपला विचार मांडायला तो घाबरत नाही. त्यात त्याची लेखनाची शैली अत्यंत लोभसवाणी आहे. त्यात थेट मुद्दा, थेट प्रश्न आणि थेट जवाब असतो. त्यामुळे तरुण वर्गदेखील त्याच्या पोस्टकडे आकर्षित होतात. अशीच एक पोस्ट त्याने पुन्हा एकदा लिहिली आहे आणि ती चर्चेत आली आहे. यावेळी आस्तादची पोस्ट किराणा मालाच्या दुकानात वा फूड मॉलमध्ये वाईन विक्री संदर्भात आहे. या पोस्टमध्ये त्याने काही किस्से आणि वर्णन सांगताना अखेर म्हटले आहे कि, दुकानात मुलांनी विचारलं कि, हि दारू आहे? तर सरळ ‘हो’ म्हणायचं. यामुळे आस्तादची हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
अभिनेता आस्ताद काळे याने सोशल मीडियावर हि पोस्ट लिहिली आहे. आस्तादने यात लिहिले आहे कि, माझी एक स्पष्ट धारणा आहे. लहान मुलं प्रश्न विचारतात..विचारणारच…विचारलेच पाहिजेत. ते प्रश्न निरागस असले, तरी कधीकधी गोत्यात आणणारे असतात हे मान्यच आहे. पण त्यांची उत्तरं “खरी” असावीत. त्यांच्या वयानुसार त्या उत्तराचं स्वरूप असावं, पण ते खोटं नसावं. एक प्रसंग सांगतो.
मी पार्ल्यातल्या एका औषधांच्या दुकानात गेलो होतो. काही सामान्य, आपण घरात नेहमी ठेवतो तसली औषधं घ्यायला. तिथे एक कुटुंब आलं होतं. नवरा बायको आणि साधारण ५-६ वर्षांचं मूल. (इथे मुद्दामच मुलगा/मुलगी लिहिलं नाहीये) त्यांचीही खरेदी चालू असताना ते लहान मूल म्हणालं,” आई ते काय आहे?”
पाहीलं तर Durex Condomsच्या पाकिटाकडे ते बघत होतं.
आई-वडालांची किंचित तारांबळ उडालेली स्पष्ट दिसली.
आणि मग वडिलांनी पटकन सांगितलं,”काही नाही. Chewing Gum आहे.”
आणि मग एकच हट्ट, पुढे रडारड सुरू झाली “मला हवं…मला हे chewing gum हवं…..”
वरवर पाहाता हा प्रसंग खूप विनोदी वाटतो. मलाही तेव्हा वाटला. पण नंतर मी विचार केला माझ्या अपत्यानी हा प्रश्न या वयात विचारला तर?? मी, किंवा त्याची आई काय उत्तर देऊ?? खरं उत्तर द्यायला हवं हे ठरलेलं असताना, त्या वयाचा विचार करता मला तेव्हा सुचलेलं उत्तर असतं.. “ती एक खूप महत्तवाची, गरजेची गोष्ट असते, आहे. पण अजून तू लहान आहेस. आत्ता तुला तिची गरज नाही. जेव्हा तेवढा/तेवढी मोठा/मोठी होशील, तेव्हा मी आणि आई स्वत: तुला सगळं सांगू. प्रॉमिस. पण बाहेरून कोणाकडून त्याबद्दल काही कळलं, तू ऐकलंस, तर आधी येऊन आम्हाला सांग. प्रॉमिस?? ती वस्तू घाणेरडी नाहीये. उपयुक्तच आहे. पण कशी, आणि का, हे काही वर्षांतच तुला सांगू.” (हेच संभाषण sanitary padsच्या बाबतीतही घडू शकलं असतं.)
मला माझ्या पालकांनी कधीच खोटी उत्तरं दिली नाहीत. मी लहान असताना घरच्या पार्टीमधे विचारलं होतं,”तुम्ही काय पिताय?” तेव्हा “ही बियर आहे” हे उत्तर मिळालं होतं.
मी:- कशी लागते?
ममा/बाबा:- छान लागते. बघ चव.
एक छोटा घोट दिला.
मी:- कडू आहे.
म/बा:- हो. थोडी कडवट असते.
मी:- मी पण पिऊ?
म/बा:- आत्ता नाही. २१ वर्षांचा झालास की पहिला official glass आम्ही भरून देऊ.
हे संभाषण असंच काहीसं, नंतर रम, व्हिस्की, वोडका वगैरेंच्या बाबतीत झालं.
पण कधीच मला,”हे औषध आहे”, “हे शी-घाण आहे” वगैरे खोटी उत्तरं दिली गेली नाहीत. आणि ६-७ वर्षांचा झाल्यावर हे चव देणंही पूर्णपणे थांबलं.
मी लहान (३-४ वर्षांचा वगैरे)असताना घरी आजोबाही होते. ममा-बाबा एकदा बाहेर जायची तयारी करत होते.
मी:- कुठे चाललायत?
ते:- फिल्म बघायला.
मी:- मी पण येऊ?
ते:- नाही. ही मोठ्या माणसांची फिल्म आहे. तू लहान आहेस. तुला allowed नाहीये.
इथे विषय संपला. “आईला डॉक्टरकडे नेतोय टुच्च करायला” ही एक थाप अशाप्रकारच्या प्रसंगी प्रचलित असायची तेव्हा. हे सगळं आत्ता लिहायचं कारण म्हणजे, “वाणसामान आणायला दुकानात गेल्यावर लहान मुलांनी विचारलं ‘हे काय आहे?’ तर काय सांगायचं? बाळा ही दारू आहे??!!!” हा सूर खूप प्रकर्षानी जाणवला. तर….हो!!!!! असंच सांगायचं. हे माझं स्पष्ट मत आहे.
आस्तादची हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर विविध मतप्रवाह तयार करताना दिसत आहे. मात्र आस्तादच्या पोस्टवर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे दिसून येत आहे.
Discussion about this post