हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील नामक भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्यानंतर हा वाद चांगलाच उफळल्याचे दिसत आहे. दरम्यान आपण राजकीय भूमिका घेत असल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आलं असा आरोप किरण माने यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणावर महाराष्ट्रभर पडसाद उमटत आहेत. शिवाय अनेक कलाकार आणि नेते मंडळी माने यांना खंबीर पाठिंबा देताना दिसत आहेत. यात आता माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील मुख्य अभिनेत्री अनिता दाते हिने पोस्ट शेअर करीत किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.
झी मराठीवरील अत्यंत गाजलेली मालिका माझ्या नवऱ्याची बायको यामध्ये राधिका नामक मुख्य नायिकेची भूमिका करणारी अभिनेत्री अनिता दाते हिने किरण माने यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे. याच मालिकेत अनिता आणि किरण यांनी एकत्र काम केले होते. यामुळे फेसबुकच्या माध्यमातुन एक कलाकार म्हणून मी दुसऱ्या कलाकारावर अन्याय होऊ देणार नाही अश्या आशयाची पोस्ट अनिताने केली आहे.
ही पोस्ट लिहिताना अभिनेत्री अनिता दातेने लिहिले आहे की, एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने ह्यांच्या बाजूने आहे. कोणत्याही अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला आगाऊ कल्पना न देता अथवा कोणतीही समज न देता अथवा कोणतेही कारण न देता कामावरून बाजूला करणे हे चुकीचे आहे . अश्या निर्मिती संस्था आणि चॅनल ह्यांनी त्या कलाकाराला कामावरून काढण्याचे योग्य कारण देण्याचे सौजन्य दाखवले पाहिजे. अश्या व्यवस्थांचा मी निषेध करते.
व्यवस्था समजून घेणे ,व्यवस्थेला प्रश्न विचारणे ,आपली राजकीय भूमिका योग्य पद्धतीने मांडता येणे ही खरंतर चांगली गोष्ट आहे असच मी मानते. त्या बाबत किरण माने ह्याचे कौतुक आहे. एखाद्या व्यक्तीची पोस्ट समजून घेण्याऐवजी त्याची गळचेपी करणे हे चुकीचे आहे. आपली राजकीय भूमिका वेगळी असेल तर आपण त्या व्यक्तीशी वाद घालू शकतो ,चर्चा करू शकतो.. मात्र त्याचं तोंड बंद करणे, त्याला धमकावणे, त्याच्या व्यवसायावर, कामावर टाच आणणे हे समाज म्हणून आपण निर्बुद्ध व मागास असल्याचे लक्षण आहे. अनिताच्या या पोस्ट वर सध्या विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
दरम्यान अनिता दातेच्या या पोस्टवर युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. काहींनी अनिता दातेच्या पोस्टचं समर्थन केलं आहे तर काहींनी यावरून अनिताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
अनिता दाते हिच्याआधी दिग्दर्शक समीर विद्वांसने पोस्ट शेअर करत किरण मानेंना पाठींबा दिला होता. कोणतीही राजकीय भुमिका घेणं/व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे, किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरून त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे, असंट्वीट समीर विद्वांसने केलं होतं.
Discussion about this post