हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात रिंकू राजगुरू अर्थात प्रेक्षकांची लाडकी आर्ची आणि आकाश ठोसर अर्थात प्रेक्षकांचा लाडका परश्या हे दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांना पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित चित्रपट आहे. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची मुख्य भूमिका साकारत आहेत.
‘झुंड’च्या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. झुंड’चा ट्रेलर सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या मुलांची फुटबॉल टीम बनवण्याचं स्वप्न विजय पाहतात. मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुलांना कॉलेज कॅम्पसमध्ये आणायचे नाही अशी अनेकांची भूमिका असते. या मुलांचं आयुष्य ते कसे बदलतात हे यामध्ये पहायला मिळेल. दमदार संवाद, कमाल पार्श्वसंगीत, विना ग्लॅमर लक्षवेधी कलाकार हि ट्रेलरची वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये अनेक मराठी कलाकार आहेत. यात ‘सैराट’ या चित्रपटाची टीम म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर दिसून आल्यामुळे चाहते आणखीच उत्सुक झाले आहेत. हा चित्रपट येत्या ४ मार्च २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘सैराट’ चित्रपटाचे अभूतपूर्व यश पाहता मंजुळेंच्या या बॉलिवूड पदार्पणाबाबत अनेकजण अपेक्षा लावून आहेत. सैराटच्या निमित्ताने रिंकू आणि आकाश हे पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आले होते आणि ते आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांच्या नव्याकोऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचं लक्ष चित्रपटाकडे वेधलं आहेच. शिवाय सोशल मीडियावरही हा ट्रेलर चर्चेत आहे. अजय- अतुल या लोकप्रिय जोडीने या चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन आहे.
Discussion about this post