हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जम्मू- काश्मीर खोऱ्यातील दहशतवादग्रस्त कुटुंबांतील मुलाचा शोध घेऊन त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने घेतला आहे. याबाबतची माहिती ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते पुनीत बालन यांनी दिली आहे.
ड्रग्ज आणि दहशतवादामुळे ज्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे अशा मुलांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा फाऊंडेशनाचा हा स्तुत्य प्रयत्न आहे. विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. आताही दहशतवाद पीडितांना मदत करण्याचा त्यांचा मानस आहे.
जम्मू-काश्मिरममधील राजुरी भागात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दहशतवादी घटनेत तेथील लहान मुलांना त्याचा फार मोठा फटका बसला. अशा घटनांनी प्रभावित झालेल्या मुलांपुढे शिक्षणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने अशा दहशतवादग्रस्त कुटुंबांचा शोध घेऊन त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
अतिरेक्यांनी केलेल्या हत्या आणि अनाथ झालेली मुले आणि त्यातून उद्वस्त झालेली कुटुंबं यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पुनीत बालन म्हणाले की, ‘’फाउंडेशनला या मुलांना शक्य तितकी मदत करायची आहे. इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारचे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. परंतु आम्ही जम्मू आणि काश्मीर निवडले कारण कुणीतरी पु़ढे येऊन अशी सुरवात केली पाहिजे. जेणेकरुन पृथ्वीवरील स्वर्ग असे बिरूद मिरवणाऱ्या काश्मिरमधील मुलांच्या भविष्यात काळोख निर्माण होणार नाही. याची सुरवात आम्ही करत आहोत’.
दरम्यान ऑगस्ट २०१९ मध्ये काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर मुलांचे शिक्षण आणि इतर विकास प्रकल्पांवर काम सुरू करणारे पुनीत बालन पहिले उद्योजक आहेत. काश्मिरी मुलांच्या शिक्षणासाठी ‘नेशन फर्स्ट’ या उपक्रमात फाऊंडेशनने आघाडीची भूमिका बजावली आहे. बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी, त्रेहगाम आणि गुरेझ या दशहतग्रस्त भागात भारतीय सैन्याने स्थापन केलेल्या १० शाळा चालवल्या जात आहेत. ते बारामुल्ला येथील डॅगर स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रनला तांत्रिक, शैक्षणिक आणि आर्थिक सहाय्य देखील करत आहे. याशिवाय काश्मिरी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीही पाठिंबा देत आहे. आतापर्यंत, फाऊंडेशनने घाटीतील अशा पाच हजार तरुणांना मदत केली आहे.
फाऊंडेशनच्या पाठिंब्याने मुंबई खेळाडूंसाठी खो- खो खेळणारा उमर अहमद म्हणाला, ‘मी सेना आणि पुनीत बालन यांचा आभारी आहे. मला या फाऊंडेशनने मला सर्वतोपरी मदत केली आहे’. विविध राज्यांतील आठ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेले सायकलपटू मोहम्मद सलीम शेख यांनी सांगितले की, ‘फाऊंडेशनकडून त्यांना मोठे सहकार्य मिळाले आहे. फाऊंडेशन आणि लष्कराच्या पाठिंब्यामुळे मी मोठी मजल मारु शकलो’.
Discussion about this post