हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुचर्चित आगामी दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा- द रुल’च्या प्रतीक्षेत प्रेक्षक आकंठ बुडाले आहेत. अलीकडेच या चित्रपटातील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या मुख्य भूमिकेचा एक अतिशय वेगळा लूक सोशल मीडियावर रिव्हील करण्यात आला आहे. जो पाहून प्रेक्षकांमध्ये विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. खरंतर ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटातील पुष्पाचा अंदाज आणि ‘पुष्पा- द रुल’मधील पुष्पाचा बदललेला अंदाज दोन्हीमध्ये फार तफावत आहे. जी पाहून खरंच या भागातील कथानकाचा कोणत्या धार्मिक परंपरेशी संबंध तर नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अलीकडेच पुष्पाच्या दुसऱ्या भागाची झलक दाखवणारा टीझर प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये पुष्पाचा लूक दाखवला असता त्याच्या वाढलेल्या नखावरील नेलपेंट लक्ष वेधून घेत आहे. तर पोस्टर रीलिजमध्ये अल्लू अर्जुनचा एकदम हटके आणि जबरदस्त असा रौद्र अवतार दाखवला आहे. त्याचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. या लूकमध्ये त्याने गळ्यात वेगवेगळे सुवर्णालंकार परिधान केले आहेत. हारतुरे, लिंबाची माळ, अंगावर साडी हातात बंदूक पण मागे त्रिशूळ दिसत आहे. हे पोस्टर पाहून अनेकांनी रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ची आठवण काढली. सोबतच या लुकचा संबंध एका धार्मिक परंपरेशी असल्याचीही चर्चा सुरु आहे. हा लूक ‘गंगम्मा यात्रे’पासून प्रेरित असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.
‘गंगम्मा यात्रा’ हा एक लोककला उत्सव असून कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या काही भागांमध्ये साजरा केला जातो. प्रतिवर्षी मे महिन्यामध्ये ७ दिवसांच्या कालावधीत हा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये ७ पैकी २ दिवस एका यात्रेचं आयोजन केलं जातं आणि या यात्रेत पुरुष वेष बदलून महिलांसारखे सजून यात्रेत सहभाग घेतात. त्यामुळे ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनचा हा लूक याच यात्रेसी संबंध दर्शवित असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. रिपोर्टनुसार, ‘पुष्पा २’ हा चित्रपट येत्या १६ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post