हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती आणि ऍपच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यानंतर त्यांच्या वकिलाने राजला ज्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक करण्यात आली ते चित्रपट पॉर्नोग्राफी प्रकारात मोडत नसल्याचा अजब युक्तीवाद केला आहे.
राजचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना सोमवारी मुंबई पोलिसांकडून केलेल्या अटकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी २०२१ दरम्यान अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात राज कुंद्रा मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी या कारवाईच्या समर्थनार्थ केला होता. त्यावर राजने आपले वकील पोंडा यांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडताना त्याने निर्माण केलेल्या कंटेटला कायदेशीर भाषेत पॉर्न म्हणता येणार नाही, असा युक्तीवाद न्यायालयासमोर मांडला आहे.
पोंडा यांनी म्हटले, “माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत असणारे कलम हे आयपीसीच्या कलमांप्रमाणे नसतात. मात्र इथे पोलिसांनी तसेच केले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील कलम ६७ अ हे लैंगिक कृत्यांसंदर्भातील आहे. प्रत्यक्ष संभोगालाच कायद्यानुसार पॉर्न म्हणतात. इतर सर्व प्रकारचे कंटेंट अश्लील प्रकरणात मोडतात,”. “सध्या वेबसिरीजमध्ये जो अश्लील कंटेंट निर्माण करतात पोलीस त्याच्याच मागावर आहेत. मात्र म्हणून याला पॉर्न म्हणता येत नाही. या प्रकरणामध्ये दोन व्यक्तींनी प्रत्यक्षात शरीरसंबंध ठेवल्याचा उल्लेख आहे. जर प्रत्यक्षात शरीरसंबंध ठेवले नसतील तर त्याला पॉर्न म्हणता येणार नाही,” असा युक्तीवाद तरबेज युक्तिवाद पोंडा यांनी केला.
या प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर राज कुंद्रा यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र राजवर अश्लील पॉर्नोग्राफिक व्हिडीओंचे प्रसारण केल्याचा आरोप आहे. शिवाय हॉटशॉर्टस या अॅपच्या माध्यमातून त्यांनी हे काम केल्याचे मुंबई पोलिसांनी न्यायालयास सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयाने राज कुंद्राला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. “पोलीस कोठडी अपवादात्मक परिस्थितीत देण्यात यावी. पोलीस कोठडी हा आदर्श पर्याय नाही. अटक केल्याशिवाय तपास पूर्ण होऊ शकत नसेल तरच अटक करण्यात यावी. या प्रकरणामध्ये आरोप असणाऱ्याला अटक करुन तपासामध्ये सहभागी करुन घेण्यात आले आहे. ही अटक कायद्यानुसार झालेली नाही,” असेही पोंडा यांनी राजतर्फे बाजू मांडताना म्हटले आहे.
Discussion about this post