हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जावेद अख्तर हे बॉलिवूड सिनेविश्वातील अत्यंत नावाजलेले नाव आहे. विविध चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गाणी नेहमीच हिट झाली आहेत. नुकतंच जावेद अख्तर यांनी लाहोर येथे उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान जावेद अख्तर यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याबद्दल भाष्य केले आणि मनातील खदखद व्यक्त केली. या हल्ल्यात पाकिस्तानचा असलेला सहभाग याबद्दल जावेद अख्तर यांनी स्पष्टपणे भाष्य केले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'हम तो बंबई के लोग हैं, हमने देखा कैसे हमला हुआ था…वो लोग नॉर्वे से तो नहीं आए थे, न मिस्र से आए थे, वो लोग अभी भी आपके मुल्क में घूम रहे हैं'. – लाहौर के फ़ैज़ फेस्टिवल में जावेद अख्तर#FaizFestival2023#javedakhtar pic.twitter.com/s9s1cMYZqf
— Versha Singh (@Vershasingh26) February 21, 2023
यावेळी जावेद अख्तर म्हणाले कि, ‘आपण एकमेकांना दोष देणं थांबवलं पाहिजे, त्यामुळे कोणतीही समस्या सुटणार नाही. एकूणच सध्या जे वातावरण तापलं आहे ते कमी व्हायला पाहिजे. आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही पाहिलं आहे तेव्हा मुंबईवर कशा पद्धतीने हल्ला झाला होता. ती लोकं नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. हे लोक अजूनही तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत आणि ही खदखद एखाद्या भारतीयाच्या मनात असेल तर त्याचं तुम्ही वाईट वाटून घ्यायला नको’.
याशिवाय जावेद अख्तर यांनी आठवणीने असे नमूद केले कि, ‘भारतात मेहंदी हसन, नुसरत फतेह अली खान यांसारख्या पाकिस्तानी कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मात्र आजवर कधीच पाकिस्तानमध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही’. जावेद अख्तर यांनी मनातील ही खंतसुद्धा यावेळी व्यक्त करून मन मोकळे केले. याआधी सुद्धा जावेद अख्तर अनेकदा असेच आणि इतकेच स्पष्ट बोलताना, व्यक्त होताना दिसले आहेत. अनेकदा त्यांच्या पाकिस्तान भेटीबद्दल बऱ्याच चर्चादेखील रंगल्या आणि त्यावर टीकादेखील झाल्या. यावेळी मात्र जावेद अख्तर यांनी तिथे जाऊन उपस्थित केलेल्या या विषयांबाबत प्रत्येक भारतीय त्यांचे कौतुक करताना दिसत आहे’.
Discussion about this post