हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भीमराव रावजी आंबेडकर अर्थात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जगभरात जयंती साजरी केली जाते. आंबेडकर जयंती हा दिवस ठिकठिकाणी एखाद्या उत्सवासारखा साजरा केला जातो. यंदा हा दिवस टेलिव्हिजन जगतातही अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून झी युवा वाहिनीवर एक नवी मालिका सुरु होत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो झी युवाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेचे नाव ‘जय भीम’ असे आहे.
हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान घेऊन चालत असल्याचे दिसते. तर बाहेर जनसामान्यांची गर्दी लोटलेली दिसत आहे. त्यांना पाहून आंबेडकर सर्वांना अभिवादन करतात आणि लोकं त्यांच्या नावाचा जयघोष करतात. प्रोमोमध्ये एक संवाद ऐकू येतो. ज्यामध्ये म्हटले आहे कि, ‘ते काळाच्याही पुढे होते.. इतिहासातून शिकले.. ते शस्त्रांनी नाही तर विचारांनी आणि पुस्तकातून लढले… त्यांची लढाई म्हणजे मानवतेचा सन्मान.. जे पुस्तक त्यांनी लिहिले ते आहे ”भारताचे संविधान”’.
हि मालिका & टीव्हीवरील ‘एक महानायक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर’चे मराठी व्हर्जन असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण मालिकेत किशोर वयातील आंबेडकरांची भूमिका अथर्व कर्वे साकारताना दिसतो आहे. परंतु मोठेपणातील आंबेडकर कोण साकारणार..? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
‘जय भीम- एका महानायकाची गाथा!’ असं या मालिकेचं नाव असून याचे कथानक मानवतेच्या सन्मानाची लढाई लढणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त म्हणजेच येत्या १४ एप्रिल २०२३ पासून हि मालिका सुरु होणार आहे. आठवड्यातले ६ वार अर्थात सोमवार ते शनिवार दररोज रात्री ९ वाजता हि मालिका झी युवा वाहिनीवर प्रसारित होणार आहे. ‘जय भीम एका महानायकाची गाथा!’ या मालिकेचा प्रोमो व्हिडीओ तसेच पोस्टर पाहून आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Discussion about this post