हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट सह्याद्रीचा सिंह.. जना मनातला आवाज.. आणि मातीतला अस्सल लोककलावंत स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. नुसतं शाहीर म्हटलं तरी पुढे साबळे हे नाव ओठी येत. शाहीर साबळे हे केवळ एक नाव नव्हे तर हे एक पर्व होते. त्यांनी एक इतिहास घडवला आणि याच इतिहासाचे रुपेरी पडद्यावरील चित्रीकरण आजच्या पिढीतही शाहीर रुजवणार आहे. रिलीजसाठी अगदी तीन ते चार दिवस राहिले असताना आता ‘महाराष्ट्र शाहीर’च्या माध्यमातून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचा मल्टीस्टार व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
आज शरद पवार यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र शाहीर’ मधील जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे लोकार्पण झाले आहे. शाहीर साबळेंचं मूळ गीत असलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ऐकताच क्षणी अंगात उत्साह निर्मिती करते. हेच गाणे आता मराठी कलाकारांच्या साथीने एका वेगळ्या रूपात सादर करण्यात आले आहे. या गाण्याचे सादरीकरण करताना आपल्याला मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळी पहायला मिळतील. हे गाणे अजय गोगावले यांनी गायले आहे. या गाण्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘१ मे, एकच दिवस महाराष्ट्र दिन का साजरा करायचा? सादर करीत आहोत, आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्राचं, शाहीर साबळे यांनी अजरामर केलेलं राज्यगीत ”जय जय महाराष्ट्र माझा”.
या गाण्यामध्ये सिद्धार्थ जाधव, सुयश टिळक, अभिजीत खांडकेकर, आदिनाथ कोठारे, गश्मीर महाजनी, सचिन खेडेकर, भरत जाधव, पुष्कर जोग, प्रथमेश परब, नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सिद्धार्थ चांदेकर, उमेश कामत, ललित प्रभाकर, प्रसाद ओक, स्वप्नील जोशी आणि शिव ठाकरे या लोकप्रिय चेहऱ्यांचे दर्शन घडत आहे. या गाण्यामध्ये हे सर्व कलाकार शाहीर अंदाजात फेटा परिधान करीत गाताना दिसत आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्स यांची आहे. तर चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे हे आहेत. चित्रपटाचे संगीत अजय- अतुल यांचे आहे. तर चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे.
Discussion about this post