हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लाडका आणि आघाडीचा अभिनेता जितेंद्र जोशी याने सिनेसृष्टीचे नाव आणखी मोठे केले आहे. अत्यंत प्रतिष्ठित अशा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल २०२२ (NYIFF) मध्ये त्याने ‘उत्कृष्ट कलाकार’ म्हणून पुरस्कार पटकावला आहे. जिओ स्टुडिओजच्या ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाची या फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत होता. या फेस्टिव्हल साठी जितेंद्र हजर राहीला होता आणि त्याने आपला अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.
‘आयुष्यात ज्या गोष्टीचं स्वप्न सुद्धा पाहिलं नाही ती गोष्ट प्रत्यक्षात आली. भारत सरकार तर्फे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारे ६ सिनेमे कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाठवण्यात आले. त्यापैकी आपला गोदावरी आज येथे दाखवण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित भैया देशमुख आणि वहिनी नीस या कान्स पासून ४५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शहरावरून केवळ गोदावरी पाहण्यासाठी सकाळच्या ९.३० च्या शोसाठी आवर्जून आले. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या देशातील अनेक लोकांना आपला सिनेमा खूप आवडला. मला आणि निखिलला हा अनुभव दिल्याबद्दल मी वैश्विक शक्तीचे आभार मानतो. विश्र्वभरातील अनेक मान्यवरांसोबत एकात्मतेचा हा अनुभव अवर्णनीय आहे. ईश्वराची कृपा आहे.’ अशी भावना जितूने व्यक्त केली आहे.
पुढे तो म्हणतो, ‘ता. क. माझ्या वेशभूषेकरिता माझ्या पत्नीने खूप मेहनत घेतली. ज्यामुळे इथले अनेक लोक मला प्रेम देते झाले . तिचे ही आभार. सिनेमा झिंदाबाद!!’ अशा शब्दात त्यांनी आपले विचार मांडले आहे. जितेंद्र जोशीची पहिलीच निर्मिती असलेल्या ‘गोदावरी’ या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आल आहे. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२मध्येही ‘गोदावरी’ चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली तर सर्वोत्कृष्ट मराठी आर्टहाऊस सिनेमाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या चित्रपटानं २०२१ च्या इफ्फीमध्येसुद्धा आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरल आहे.
Discussion about this post