हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर आगामी मराठी चित्रपट ‘तमाशा लाईव्ह’ हा चांगलाच चर्चेत आहे. येत्या १५ जुलै २०२२ रोजी हा चित्रपट सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. याआधी चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना नाद लावला आहे. खरतर हा संपूर्ण चित्रपटच रसिक प्रेक्षकांसाठी संगीतमय मेजवानी आहे. अलीकडेच चित्रपटातील रोमँटिक गाण्यानंतर ‘वाघ आला’, ‘मेल्याहून मेल्यागत’ अशी रॅप सॉन्ग रिलीज झाली आहेत. यानंतर आता सोनालीने स्वतः गायलेले ‘कडक लक्ष्मी’ हे तड़खते फडखते गाणे रिलीज झाले आहे.
‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटातील गाण्यांना संगीतप्रेमी आधीच चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यात आता चित्रपटातील शेफाली अर्थात सोनाली कुलकर्णीचे ‘कडक लक्ष्मी’ हे गाणे सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. या गाण्याला क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. तर पंकज पडघन यांनी गाण्याचे संगीत दिले आहे. मुख्य बाब म्हणजे हे गाणे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेच गायले आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे. तर गाण्याच्या बोलांप्रमाणेच सोनाली कुलकर्णी यात आक्रमक स्वरूपात तिची व्यथा व्यक्त करत आहे. गाण्याचे नाव ‘कडक लक्ष्मी’ असून सोशल मीडियावर कडक लक्ष्मी चांगलीच पावलीये.
नव्या कोऱ्या जल्लोषमयी ‘कडक लक्ष्मी’ या गाण्याबद्दल गीतकार क्षितीज पटवर्धन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले कि, ‘हे गाणे मी शब्दबद्ध केले असले तरी सोनालीने अगदी उत्तमरित्या ते सादर केले आहे. मुळात हे गाणे ती स्वतः गायली आहे. त्यामुळे या गाण्यातील भावना या तिच्या चेहऱ्यावर आपसुकच दिसून येत आहेत.
याशिवाय प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले कि, ‘संगीतातून कथा सांगणारा ‘तमाशा लाईव्ह’ हा पहिला मराठी चित्रपट आहे. संजय जाधव यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळावेगळा प्रयोग सादर केला आहे. या गाण्यांना मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून संजय जाधव यांचा हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल याची मला खात्री आहे. “
Discussion about this post