हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तुनिषा शर्माने वयाच्या २० व्या वर्षी दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. या बातमीने संपूर्ण मनोरंजन सृष्टी हादरली. या प्रकरणाचा तपास सुरु असून तुनिषाचा मित्र शीझान खान याच्यावर शंकेची सुई आहे. या प्रकरणावर आतापर्यंत अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. यातच आता अभिनेत्री कंगना रनौतनेदेखील तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ३ पानांची नोट लिहित स्टोरी शेअर केली आहे. तुनिषा शर्माच्या मृत्यूवर आपली प्रतिक्रिया देत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा करण्याची विनंती केली आहे.
हि स्टोरी शेअर करताना कंगनाने यात लिहिले आहे कि, ‘स्त्री सर्व काही सहन करू शकते, मग ते प्रेमापासून वेगळं होणं असो किंवा लग्न तुटणे असो, नातेसंबंध किंवा इतर काहीही असो पण ती छळ सहन करू शकत नाही. तिच्या स्टोरीमध्ये प्रेम नव्हतंच ही गोष्ट ती स्वीकारू शकत नाही. समोरच्या व्यक्तीसाठी तिचं प्रेम आणि असुरक्षितता हे तिचं शोषण करण्यासाठी पुरेसं होतं. तिचं प्रेम होतं, तर समोरच्याला फक्त तिचा शारीरिक आणि भावनिक वापर करायचा होता. तिला हे जेव्हा कळालं तेव्हा ती खचली आणि तिने जर तिचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असेल, तर ते तिने एकटीने केलेलं नाही, हा खून आहे.’
यापुढे कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करताना लिहिले आहे कि, ‘मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करते की ज्याप्रमाणे कृष्ण द्रौपदीसाठी उभा राहिला, तसा राम सीतेसाठी उभा राहिला. तसेच बहुपत्नीत्वाच्या विरोधात कठोर कायदे करा. अॅसिड हल्ला करणाऱ्यांविरोधात कायदा करा. त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.’
सध्या कंगनाच नव्हे तर प्रत्येकजण अभिनेत्री तुनिषा शर्माने केलेल्या आत्महत्येसाठी शीझान खानला जबाबदार ठरवत आहे. तुनिषाच्या आईने देखील त्याच्यावर गंभीर आरोप करत म्हटले आहे कि, शीझानने माझ्या मुलीचा विश्वासघात केला होता. त्याचे अनेक मुलींसोबत संबंध होते. शीझानने या कारणासाठी तुनिषाला सोडलं होतं आणि यामुळेच तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.’
Discussion about this post