हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आतापर्यंत अनेक अव्वल प्रयोग करीत दर्जा कलाकृती इंडस्ट्रीतील दिल्या आहेत. त्यांचे योगदान फार मोठे आणि मोलाचे आहे. नाटक, मालिका आणि विविध चित्रपटांमधून ते समाज भान राखताना दिसतात. आजोबा शाहीर साबळे यांचा लोककलेचा वारसाही ते जपत आहेत. यांनतर आता शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट लवकरच ते घेऊन येत आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या तयारीला लागले असून लवकरच साताऱ्यात चित्रीकरण सुरू होणार आहे. त्याच प्रवासाची पहिली झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मराठी दिग्दर्शक, अभिनेता केदार शिंदे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोबत छान असे कॅप्शनही लिहिले आहे. यात त्यांनी लिहिलंय कि, ‘कुठल्याही सिनेमात पडद्यावर कलाकार जितका महत्वाचा रोल प्ले करतो तितकाच महत्वाचा भाग शुटिंगसाठी निवडण्यात येणाऱ्या लोकेशनचा असतो.. ते सुद्धा सिनेमाचं एक पात्रच असतं.. आणि त्यात ही महाराष्ट्र शाहीर सारखा पिरियड सिनेमा असेल तर लोकेशन निवडीचे निकष अधिकच कठीण होतात.. त्या काळातली स्थापत्य रचना.. रंगसंगती.. रस्त्यांची रचना.. घरांच्या बांधकामाची पद्धत..
अशा अनेक परीक्षा मधून जाऊन लोकेशन योग्य की अयोग्य हे ठरतं.. गेले तीन दिवस महाराष्ट्र शाहीर ची टीम ह्याच कामात व्यस्त होती.. सातारा आणि आसपासच्या भागातील अनेक सुंदर लोकेशन फिरून, निवडून, खूप भटकून, डोंगर दऱ्या चढून उतरून आम्ही जेव्हा हे तीन दिवस पूर्ण केले तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं.. महाराष्ट्र शाहीर च्या घडणीतला हा एक महत्त्वाचा टप्पा.. अजून पुढे खूप मोठा प्रवास बाकी आहे.. काही प्रवास हे मुक्कामा इतकेच सुंदर असतात!!’
मुळात शाहीर साबळे यांचे साताऱ्याशी सलोख्याचे संबंध आहेत. ते स्वतः वाई तालुक्याचे असल्यामूळे त्यांचे बालपण आणि पुढे बराचसा काळ त्यांनी साताऱ्यात घालवला आहे. आता त्यांचा जीवनपट करायचा म्हणजे त्यासाठी लोकेशन सातारा असणे फारच स्वाभाविक आहे. याच शोधात दिग्दर्शक केदार शिंदे संपूर्ण टीम घेऊन सातारा जिल्ह्यात गेले. यावेळी त्यांनी अनेक लोकेशन पाहिली. त्यातली काही ठिकाणं अंतिम केली. अखेर त्यांनी शेयर केलेल्या विडिओ मध्ये साताऱ्यातील वाई तालुक्यात चित्रीकरण करणार असे चित्र स्पष्ट दिसत आहे.
Discussion about this post