हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला अजरामर कलाकृती देणारे प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट त्यांच्यासाठी अतिशय जवळचा विषय आहे. कारण या चित्रपटातून ते आपले आजोबा लोक शाहीर साबळे यांच्या जीवनगाथेचा उलघडा करत आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी मातीशी नाळ जोडलेले कलाकार स्वतः निवडले आहेत. या चित्रपटातील अनेक भूमिकांसाठी त्यांनी नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. चित्रपटात बालकलाकारांच्या भूमिकेत असणाऱ्या छोट्यांशीदेखील केदार शिंदेंची चांगली गट्टी जमली आहे. त्यांच्याविषयी कमी शब्दात जास्त बोलणारी एक पोस्ट केदार शिंदे यांनी शेअर केली आहे.
केदार शिंदे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटासाठी बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या छोट्या दोस्तांसोबत दिसत आहेत. या फोटोतील ती चिमुकली बऱ्यापैकी प्रेक्षकांसाठी ओळखीची आहे. कारण ती बालकलाकार सांची भोयार आहे. जिने झी मराठीच्या लोकप्रिय ‘मन झालं बाजींद’ या मालिकेत काम केले आहे. तर बालकलाकार म्हणून एका नव्या उभरत्या कलाकाराला केदार यांनी संधी दिली आहे. या दोघांकडून देखील उत्तम दर्जाचे काम करून घेताना शिंदे स्वतःच त्यांच्याकडून नवनवीन कलागुण शिकत आहेत असे त्यांनी सांगितले. हा फोटो शेअर करताना या फोटोसोबत केदार शिंदे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मला नवीन पिढीसोबत काम करायला आवडते.. खूप काही शिकण्यासारखे आहे.’
महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात केल्यानंतर केदार यांनी मुहूर्ताचा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. जो प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी काही माहिती दिली आहे. यात लिहिलंय कि, ‘वाई.. पसरणी.. शाहीर साबळेंच्या जन्मस्थळी ‘महाराष्ट्र शाहीर’च्या चित्रीकरणाचा मुहूर्त संपन्न झाला. तेव्हाचा हा व्हिडिओ. सध्या चित्रीकरण मुंबई, पुणे, सातारा, वाई, भोर येथे उत्तम सुरू आहे. चित्रपटासंबधीत नव्या गोष्टी घेऊन लवकरच भेटू.’ याचा अर्थ असा कि चित्रपट तयार होतानाचा प्रत्येक प्रसंगासोबत ते चाहत्यांना जोडून घेणार आहेत. या पोस्टमुळे त्यांचे चाहते आणि अनेक कलाकार मंडळी आ वासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                     
            
Discussion about this post