हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिने विश्वात असंख्य समस्या या न दिसणाऱ्या असतात. ज्यावर अनेकदा बोलणे किंवा तोडगा काढणे टाळले जाते, अशा तक्रारी आपण वारंवार कला विश्वातील तंत्रज्ञ, कलाकार तसेच संबंधित व्यक्तींकडून ऐकत आलो आहोत. या समस्यांवर चर्चा करून पर्यायी मार्ग काढणे आणि कला विश्वाला बळकट करण्यासाठी राजकीय क्षेत्रात काही मंडळी कार्यरत असतात. यातच आता भारतीय जनता पार्टीच्या चित्रपट आघाडी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस या पदाची जबाबदारी केतन महामुनी यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात केतन महामुनी हे ठोस पावले उचलत कलाविश्वाच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करणार आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयात भाजपाचे महामंत्री व भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे पालक संजय केनेकर, भाजप कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे भाजप चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष विजय सरोज,जनसंपर्क प्रमुख कौस्तुभ दबडगे यांच्या उपस्थितीत केतन महामुनी यांची महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप सरचिटणीस संजय केनेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. यावेळी भाजप चित्रपट कामगार आघाडीचे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित पुणे शहर अध्यक्ष अमित अभ्यंकर, पुणे जिल्हा अध्यक्ष शामराव कुलकर्णी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी केतन महामुनी यांनी आपल्या खांद्यावर देण्यात आलेल्या जबाबदारीसाठी आभार प्रकट करताना आपल्या पुढील कामाची सुरुवात कशी असेल याबाबत सांगितले. ते म्हणाले कि, ‘पुढील काळात मराठी चित्रपट कला क्षेत्रातील कलाकार, कामगार, तंत्रज्ञ तसेच असंघटित असलेल्या प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी काम करण्याचा निर्धार मी या निमित्ताने करत आहे’. ‘भारतीय चित्रपट कामगार आघाडीचे पालक संजयजी केनेकर साहेब यांनी दिलेली ही जबाबदारी मोठी असून चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ ते निर्माते यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे आणि आघाडी बळकट करण्याचे काम संजयजी केनेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत जोमाने केले जाईल’, अशी ग्वाही नवनिर्वाचित प्रदेश चिटणीस केतन महामुनी यांनी यावेळी दिली.
Discussion about this post