हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने आपल्या बेधडक बोलण्यामुळे आणि व्यक्त होण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. मुख्य म्हणजे त्यांनी शेअर केलेली प्रत्येक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनयासह व्यक्त होण्याच्या शैलीमुळे त्यांची लोकप्रियता फार जास्त आहे. त्यांची कला पारखून सातारा जिल्ह्यातील मायणी गावातील गावकऱ्यांनी मानेंना ‘मायणी भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या पुरस्कारासाठी किरण मानेंनी सोशल मिडीयावर पोस्ट करीत गावकऱ्यांचे आभार मानले आहेत.
किरण मानेंनी लिहिले कि, ‘लै जनांना वाटतं माझं मूळ गांव मायणी. पन खरं तर माझं मूळ गांव चिंचणी अंबक… पन मी ल्हानाचा मोठा झालो मायणी गांवात. दोन्ही गांवांवर माझा आनि त्या गांवांचा माझ्यावर लै जीव. मायणीनं तर पाच वर्षांपूर्वी माझा एक लै भारी सन्मान केला. त्याची आठवन फेसबुकनं वर काढली… “हॅलो, किरण माने आहेत का? नमस्कार. तुम्हाला ‘मायणी भूषण’ पुरस्कार जाहीर करत आहोत. २८ तारखेला पुरस्कार वितरण समारंभ आहे !” सुरमुख सरांचा फोन होता. फोन बंद केला.. मी जिथं होतो तिथं शरीरानंच र्हायलो. मन बुंगाट पळत सुटलं.. धडपडत – ठेचा खात – चालत -पळत – अडखळत.. बेभानपणे जगलेल्या आयुष्याच्या वाटेवरनं…उल्टं ! …डायरेक्ट मायणीच्या ‘चांदनी चौका’त ब्रेक लागला. ‘ढ्ढिढ्ढिपाडी ढिप्पांग, ढिंप्प्पांग टिपांग’…ल्हानपणी ‘धनगरी इठोबा’च्या देवळापुढं रोज संध्याकाळी रंगनारा ‘गजी’च्या ढोलाचा-झांजांचा नाद कानात घुमायला लागला. चांदनदीवरचा पूल वलांडून माझं मन थेट मायणीत पोचलं !
…आठवलं, एकदा चांदनदीला आलेला पूर. पलीकडं गावात अडकलेला मी. मग जुन्या मराठी शाळंच्या कडंकडंनं चालत विटा रस्त्यावर आलो, आन तिथनं चालत-चालत घरी पोचलो. …’अभ्यासाला महादेवाच्या देवळात जातो’ असं सांगून तिथल्या विहीरीत पवायचो, सूरपाट्या खेळायचो… महादेवाच्या गाभार्यात आवाज घुमवत यारानामधलं बच्चनचं “भोलेS ओ भोलेS” म्हनायचो. …एका पावसाळ्यात यशवंतबाबांच्या देवळात तीन-चार तास बसून पाह्यलेला, काळजाचा ठोका चुकवनारा तुफानी,भयंकर पाऊस.. अंगावर काटा आणणारा ढगांचा गडगडाट….यशवंतराव चव्हाण गेले तेव्हा आपल्या घरातलंच कुणी गेल्यागत सुन्न झालेला अख्खा गांव. तलावावर दरवर्षी सातासमुद्रापल्याडनं येणारे पक्षी…
…गावभर बडबडत फिरणारा ‘येडा’, पन शाळेत सुरू असलेलं ‘जनगणमन’ ऐकू आलं की शहान्यासारखा उभा र्हानारा दादा गुरव.. दरवेळी मारामारी-हाफ मर्डर करून अटक होनारा.. आनि तुरूंगातनं सुटून आल्यावर गावकर्यांचा थरकाप उडवणारा, पन मला बघून हसून प्रेमानं जवळ घेऊन “अय् किरन्या, भारूड म्हन की.” असं म्हनत “ह्या ह्या शेजारनीनं, बरं न्हाई केलं गं बया” हे भारूड मला म्हणायला लावून खळखळून हसनारा काळाकभिन्न ‘महाल्या रामोशी’! बाजारच्या दिवशी रामोस आळीतनं हालतडुलत येनारे चिंगाट-तर्राट दारूडे.. मी अस्सल गावरान शिव्या शिकलो ते ह्याच आळीत…शिव्यांबरोबरच हितल्या म्हातार्या बायकांच्या तोंडच्या जात्यावरच्या ओव्या, हितलं भजन,किर्तन, श्रावनातल्या पोथ्या, नाथाच्या देवळातला दगडी हत्ती, येळगांवकर सरांचं वाचनालय, यशवंतबाबाचा रथ, तंबूतला पिच्चर, जत्रंतला तमाशा, कोटाचं मैदान..ज्या मैदानात पयल्यांदा स्टेजवर उभा र्हायलो ! हितली दिवाळी,होळी,बेंदूर, हितल्या पेरूच्या बागा, रानात पिसारा फुलवून नाचनारे मोर, हितली झाडं..दगड..माती.. काय-काय सांगू? लै लै लैच आवडायचं हे सगळं ! काळजावर-मेंदूत कोरलं गेलंय…
माझ्या मूळ गांवात चिंचणीत माझ्या आजोबांनी बांधलेलं घर हाय.. शेती हाय.. चुलते,चुलत्या,भावंडं हायेत..तिथल्या लोकांचंबी माझ्या लै प्रेम हाय ! पन जिथं मी ल्हानाचा मोठा झालो-रूजलो-घडलो-वाढलो, अशा गावानं मला ‘मायणी भूषण’ पुरस्कार देनं, ह्यासारखा दूसरा सन्मान नाय भावांनो. …माझ्यावर अतोनात आनि निरपेक्ष प्रेम करनार्या माझ्या मातीतल्या लोकांनो, तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम करत राहीन आयुष्यभर ! बास, एवढंच !!’ – किरण माने.
Discussion about this post