हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने एक कलाकार आहेतच, शिवाय ते एक उत्तम वक्ता आहेत. मालिका करता करता त्यांनी मराठी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आणि हळू हळू तमाम प्रेक्षकांच्या मनातही ते वसले. या शोनंतर ग्रामीण भागातील त्यांचं क्रेझ पाहण्यासारखं झालं. विविध ठिकाणी कार्यक्रम, समारंभ, उदघाटन, शिबिरं स्थळी त्यांना आवर्जून आमंत्रण दिले जाते. असेच एका विद्यार्थी शिबिरात मुला- मुलींना भेट द्यायची म्हणून सुट्टीच्या दिवशी ते गेले आणि मग गप्पांमध्ये त्यांनी विविध विषयांवर प्रकाश टाकला. याविषयी त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
हि पोस्ट शेअर करताना किरण माने यांनी लिहिलंय कि, ‘भटक्या, विमुक्त समाजातली टीनएजर मुलंमुली… काहीजण लहान वयातच आईवडिलांचे छत्र गमावल्यामुळं दिशाहिन झालेले… काहींनी वडिलांच्या व्यसनाधिनतेमुळे पोट भरण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग स्विकारलेला… काही मुली लहान वयातच भयानक प्रसंग आल्यामुळे आयुष्य उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या…काही निसरड्या वयात अनवधानानं झालेल्या चुकीमुळे समाजाने वाळीत टाकलेल्या… अंध तर काही अपंग…अशा मुलामुलींना आधार देऊन, शिक्षण देणारे.. त्यांच्यातले टॅलेन्ट, कलागुण हेरून त्यांना आयुष्यात भक्कमपणे उभं करणारे मैत्रकूलचे किशोर गणाई आणि त्यांच्या सहकार्यांविषयी खूप ऐकून होतो’.
‘मागच्या आठवड्यात अचानक विद्यार्थी भारतीमधूनच फोन आला, “किरणसर, सातार्याजवळ आमच्या महाराष्ट्रभरातल्या मुलामुलींचे एक शिबीर भरवतोय. ब्रह्मपुरुच्या गाडगेबाबा आश्रमशाळेत. डाॅ.आ.ह. साळुंखे तात्यांच्या हस्ते उद्घाटन करतोय. शिबिराची टॅगलाईन आहे, ‘डिकोडिंग – आमच्या धडावर आमचंच डोकं’ ! मुलांची आणि आमचीही मनापासून इच्छा आहे की तुम्ही एक दिवस वेळ काढून सगळ्यांशी गप्पा मारायला यावं.” मी शुटिंगमध्ये खूपच बिझी होतो. शक्य नव्हतं खरंतर. पण मुलांना किरणसर हवेच होते. संस्थेच्या साक्षी भोईरनं अक्षरश: रोज पाठपुरावा केला. फोनवर फोन. मुलांची ‘विल पाॅवर’ खूपच स्ट्राॅंग असावी बहुतेक. एक दिवस सुट्टी मिळाली. गेलो गप्पा मारायला’.
‘आमच्या धडावर आमचंच डोकं! विषय काळजाच्या जवळचा. बोलता-बोलता अक्षरश: हरवून गेलो. मुलामुलींनी खूप प्रश्न, खूप शंका विचारल्या… बुद्ध-तुकारामांपासून ते वर्तमानात भवताली घडणार्या घटनांबद्दल… पहिलवान मुलींचे आंदोलन, केरला स्टोरी, सांस्कृतिक वर्चस्ववाद, कलावंतांची मुस्कटदाबी, स्वत:ला घडवण्यासाठीचा संघर्ष प्रत्येक गोष्टीवर मुलामुलींना खूप काही जाणून घ्यायचं होतं… त्यांना मुलगी झाली हो च्या ‘विलास पाटील’ या भुमिकेविषयीही ऐकायचं होतं आणि त्यानंतर झालेल्या वादांत ‘किरण माने’नं घेतलेल्या भुमिकेविषयीही मला बोलतं करायचं होतं ! बिगबाॅसचा अनुभवही ऐकायचा होता, त्यानंतरचा प्रवासही जाणून घ्यायचा होता. तीन तास कमीच पडल्यासारखं वाटलं. अशा गोष्टी माझ्यातल्या माणसासह अभिनेत्यालाही समृद्ध करतात भावांनो. मला लै लै लै भारी वाटतं जेव्हा अशा संस्था, अशी मुलंमुली मला ‘आपला माणूस’ मानतात, माझ्यावर निरपेक्ष आणि अतोनात प्रेम करतात. आजकाल कलाकारांना असं समाधान लाभणं दुर्मिळ झालंय. मी लै श्रीमंत कलावंत हाय!’
Discussion about this post