हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारे अभिनेते किरण माने विविध विषयांवर व्यक्त होत असतात. याशिवाय विविध सण, धर्म, परंपरा यांविषयी देखील ते अनेकदा अतिशय वेगळ्या पद्धतीने मत प्रकट करताना दिसतात. आज ‘बुद्ध पौर्णिमा’ आहे आणि या निमित्त किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. आजचा हा दिवस गौतम बुद्धांची जयंती आणि त्यांचा निर्वाण दिवस आहे. आजच्याच दिवशी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती असे म्हटले जाते. म्हणूनच ज्ञानाच्या चार गोष्टी सांगणारी पोस्ट मानेंनी शेअर करत लक्ष वेधून घेतलं आहे.
हि पोस्ट शेअर करताना अभिनेते किरण माने यांनी लिहिले आहे कि, ‘द्वेषाविरोधातला विद्रोह – प्रेम करणं.. असत्याविरोधातला विद्रोह – सत्य शोधणं.. गुलामगिरीविरोधातला विद्रोह – स्वातंत्र्य मिळवणं.. विषमतेविरोधातला विद्रोह – समता मानणं.. अन्यायाविरोधातला विद्रोह – न्याय देणं.. पाठीमागून अंगावर चाल करून येणार्या’निर्बुद्ध’ सांडांबरोबर, विवेकी विचारांनी ‘युद्ध’ खेळणं : ‘बुद्ध’ अंगीकारणं!’. या पोस्टसोबत किरण माने यांनी अतिशय सुंदर अशा गौतम बुद्धांच्या मूर्तीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
किरण माने यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. शिवाय या पोस्टवर अनेक नेटकरी ‘नमो बुद्धाय!’ अशी कमेंट करताना दिसत आहेत. जगाला शांततेचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या आणि लोकांमध्ये दया, क्षमा, शांतीचा प्रसार करणाऱ्या, असत्याला सत्याने जिंकण्याची शिकवण देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांचा आज निर्वाण दिवस आहे. त्यामुळे गौतम बुद्धांच्या अनुयायी वर्गात ‘बुद्ध पौर्णिमा’ या दिवसाचे विशेष महत्व आहे. आजही भगवान गौतम बुद्ध यांचे अनुयायी जगभरात दया, क्षमा, शांती आणि माणुसकीचा प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यरत आहेत.
Discussion about this post