हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका क्षेत्रातील अभिनेता किरण माने हे त्यांच्या रोखठोक व्यक्तिमत्वामुळे चर्चेत असतात. त्यांच्या सोशल मीडिया फेसबुकवरील पोस्ट प्रचंड व्हायरल होत असतात. मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात पोहोचलेला हा अभिनेता नेहमीच सामाजिक भान जपत विविध विषयांवर भाष्य करतो. सध्या साताऱ्यातल्या तरुणाईबद्दल एक भली मोठी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे.
किरण माने यांनी लिहिले आहे कि, सातार्यातल्या तरूणाईचं कलाक्षेत्रात हल्ली लै भारी काय काय चाल्लेलं असतं ! सगळे आवर्जुन मला लिंक्स वगैरे पाठवत असतात. मी बघून बरेवाईट जे असेल सांगतो. चुका सांगीतल्या तरी राग धरत नाहीत. माझं त्यांच्यावर आणि त्यांचं माझ्यावर लै प्रेम. माझ्यापुढं लहानाची मोठी झालेली पोरंपोरी आज अभिनय-दिग्दर्शन-लेखन क्षेत्रात नवनविन प्रयोग करत, स्वत:ला घडवताना पहातो, तेव्हा मी माझा सुरूवातीचा काळ पुन्हा अनुभवतो. त्यातलेच श्रावणी सोळस्कर, आशिष पुजारी आणि प्रसन्न शिंदे ! तिघेही माझ्या लै जवळचे. श्रावणीचे वडील माधव हा माझा नाटकाच्या ग्रुपमधला जुना सहकारी, तर प्रसन्नचे वडील हे मला अगदी भावासारखे.
श्रावणीची निर्मिती, आशिषचं दिग्दर्शन आणि प्रसन्नची प्रमुख भुमिका असलेली वेबसिरीज सुरू होतीये… ‘राधाकृष्ण’ ! या वेबसिरिजचा पोस्टर लाँच सोहळा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माझ्या हस्ते पार पडला. शिवेंद्रसिंहराजे उर्फ बाबामहाराज खूप दिवसांनी भेटले. मनमुराद गप्पा झाल्या. मागच्या इलेक्शनआधी पक्षांतर केल्यापासून बाबामहाराज भेटले की आमची गंमतीशीर खेचाखेची सुरू असते. विधानसभेतल्या भाषणांसारखी. ते ही मोठेपणाचं टेन्शन न घेऊ देता दिलखुलासपणे हसून उत्तरं देतात. सातारकरांचं एकमेकांशी असलेलं नातं हे कुठल्याबी पक्ष आणि विचारधारेपलीकडचं !
पार्टीत नविन पोरंपोरी भेटली. उत्साहानं कलाक्षेत्रात खूप काही करू पहाणारी. त्यांच्याशीही मनमुराद गप्पा झाल्या. आशिष-श्रावणी दोघांनीही वेबसिरीज निर्मितीत गेली चारपाच वर्ष जे सातत्य दाखवलंय, ते खरंच कौतुकास्पद आहे. नवनविन तरूण कलाकारांना संधी देऊन वेगवेगळे विषय हाताळतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत त्यांचा म्हणून एक प्रेक्षकवर्ग तयार झालाय हे बघून लै भारी वाटतं. ‘राधाकृष्ण’ वेबसिरीजच्या यशासाठी सगळ्या टीमला खूप खूप मनापास्नं शुभेच्छा ! – किरण माने.
Discussion about this post