हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन क्षेत्रातील मराठी अभिनेता किरण माने हे त्यांच्या वादग्रस्त आणि थेट भिडणाऱ्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. यामुळे अभिनयापेक्षा जास्त ते आपल्या टोकदार आणि धारदार बाण्यासाठी जास्त प्रसिद्ध आहेत. तूर्तास त्यांची फेसबुकवरील एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये त्यांनी ‘पुरुषोत्तम २०२२’ या एकांकिका नाट्य स्पर्धेचा निकाल काय आला..? हे सांगताना इतर नट तसेच नट्यांना मिळणाऱ्या पुरस्कारांवर भाष्य केले आहे. लायकी नसलेल्या नटनट्यांना ॲवाॅर्डस् घेताना पाहिले आहे.. असे म्हणत त्यांनी वास्तवाशी संबंधित हि पोस्ट शेअर केली आहे.
यामध्ये किरण मानेंनी लिहिलंय कि, ‘…गेल्या पंचवीस वर्षांत मी अनेक चकचकीत, झगमगाटी ॲवाॅर्ड फंक्शन्स मध्ये बहुतांश वेळा लायकी नसलेल्या नटनट्यांना ॲवाॅर्डस् घेताना पाहिले आहे. काही सन्माननीय आणि मोजके अपवाद वगळून. खूप वेळा चॅनलमध्ये काम करणार्यांशी किंवा परीक्षकांशी ‘सख्य’ असलेल्या सुमार कलावंतांनी ट्राॅफीज मिरवलेल्या पाहील्या आहेत. कलाक्षेत्रात गटबाजी आणि ‘मिडीया हाईप’ करणार्या सुमारांनी थयथयाट माजवलेला हा काळ आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘पुरूषोत्तम’ स्पर्धेचा निकाल अत्यंत स्तुत्य आहे. एकही एकांकिका पारीतोषिक देण्याच्या पात्रतेची नसल्याचे जाहीर करणे हा ‘पुरूषोत्तम’च्या परंपरेचा मानबिंदू ठरावा असा निर्णय आहे. कुणी चाकोरी मोडली, चौकट तोडली की हादरून,बिथरून गहजब माजवणारे सगळीकडे असतात. त्याकडे दुर्लक्ष करणे उत्तम. भवतालच्या बजबजाटात निदान काही पुरस्कार समारंभ आणि स्पर्धा तरी निकोप, निर्भेळ आहेत, याचा दिलासा देणारी ही घटना आहे !
…परीक्षक हिमांशू स्मार्त हे मराठी नाट्यक्षेत्रात हलक्यात घेण्यासारखे नांव नाही. नवोदित मुलामुलींकडे तुच्छतेने नव्हे, तर जिव्हाळ्याने-ममत्वाने पहाणारा तो कलावंत आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो. त्याच्याकडे ‘नाटक’ शिकणारे आणि शिकून मोठे झालेले कोल्हापूर आणि पुण्यातले हज्जारो विद्यार्थी हेच सांगतील. …जिथं अजिब्बात वशिला चालत नाही, केवळ ‘गुणवत्ता’ पाहिली जाते, अशा अमेरिकेच्या ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चा प्रतिष्ठीत नाट्यपुरस्कार मिळवलेला तो रंगकर्मी आहे. …एवढंच नव्हे, तर कलेच्या क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या आणि कला क्षेत्रातच महत्वाकांक्षी कारकिर्द करू इच्छिणाऱ्यांना ‘साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान’ची मानाची ‘विनोद दोशी फेलोशिप’ दिली जाते. ती पटकावलेला तो रंगधर्मी आहे. ‘साठोत्तरी मराठी नाटक : काळ आणि अवकाश’ या विषयावर त्याने पी.एच.डी. मिळवलेली आहे……मराठी नाटक आणि त्यासंबंधित असे त्यांचे ५० हून जास्त शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. असो. यादी मोठीय.
फक्त नाट्यलेखन आणि शोधनिबंध नव्हे, तर आज ललित कला केंद्र पुणे आणि भालजी पेंढारकर फिल्म ॲन्ड थिएटर ॲकॅडमी येथून अनेक कलावंतांना प्रशिक्षित करण्याचं मोलाचं काम हिमांशू स्मार्त करतो आहे. त्याच्याकडे शिकलेले अनेक विद्यार्थी आज मराठी नाटक, सिनेमा, सिरीयलमध्ये मोलाचं योगदान देताहेत. प्रत्येकवेळी घडणार्या प्रत्येक गोष्टीची कुठलीही शहानिशा, चिकीत्सा न करता बेभानपणे झोड उठवणे बरे नाही. स्पर्धकांनी आत्मपरीक्षण करावे. परीक्षकांशी सविस्तर चर्चा करावी आणि आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. फार मनाला लावून घेऊ नये. भविष्यकाळात परीश्रम करून गुणवत्ता दाखवली तर पुढे याच स्पर्धकांचा जाहीर गौरव करण्यातही हे परीक्षक मागेपुढे पहाणार नाहीत. तेवढी प्रगल्भता त्यांच्यात आहे. तूर्तास एवढेच. धन्यवाद.
– किरण माने.
Discussion about this post