हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटाच्या रिलीजनंतर सर्वत्र त्याचा बोलबाला आहे. सर्व स्तरावर फक्त आणि फक्त झुंडची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे कथानक, वास्तववादी अभिनय, कथानकातील लयबद्धता या साऱ्याने प्रेक्षक आणि समीक्षक भारावून गेले आहेत. हिंदीतील दिग्गज कलाकारांपासून अगदी निर्माते आणि दिग्दर्शक यांनीही चित्रपटाचे भरभरून कौतुक केले असून मराठी सिनेसृष्टीतूनही चित्रपटावर कौतुकाचा पाऊस पडतोय. दरम्यान सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी झुंडचे कथानक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे भरभरून कौतुक केले आहे. यानंतर आता किरण माने यांनीही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नागराज मंजुळेंसाठी लब्यु भावा पोस्ट लिहिली आहे.
सोशल मीडियावर आपले मत परखड आणि स्पष्ट मांडण्यासाठी किरण माने यांना ओळखलं जात. दरम्यान झुंड चित्रपटाविषयी व्यक्त होत नागराज मंजुळे यांचे कौतुक करताना किरण माने यांनी हात राखता घेतलेला नाही. तर भरभरून लिहिलं आहे. या पोस्टमध्ये किरण माने लिहितात कि, नागराज, लै लै लै वर्ष झाली. मी खाली पोस्ट केलेली तुझी, ‘तुझ्या येण्याअगोदर एक पत्र’ ही कविता वाचून अस्वस्थ झालोवतो. आज या कवितेचं ‘महाकाव्य’ करून तू मोठ्या पडद्यावरुन मांडलंस आणि अख्खा देश हलवून सोडलास. भारतीय सिनेमाच्या दिग्दर्शन, स्क्रीनप्ले संवाद लेखनाच्या सगळ्या रूढ चौकटी मोडून- तोडून तू खूप काही बदलतोयस, सगळी बंधनं झुगारून देऊन तुझ्या मनातलं काहीतरी मांडतोयस…सहजपणे… ‘बघाच आणि समजून घ्याच’ असा आग्रह न करता ! या पिढीसाठीही आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू ‘प्रेरणा’ ठरणार आहेस. लब्यू भावा. – किरण माने.
किरण माने यांनी या पोस्टमध्ये झुंड आणि नागराज यांचं कौतुक केलं आहेच. शिवाय या पोस्टसह त्यांनी नागराज मंजुळे यांची एक कविताही शेअर केली आहे. हि कविता अत्यंत वास्तव दर्शी आणि डोळ्यासमोर चित्र उभी करणारी आहे. हि कविता खालीलप्रमाणे आहे:-
छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच
तुझी फोर व्हीलर येऊ शकेल
खाली झोपडपट्टीत अजूनही
एक पाऊलवाटच नाक धरून
उकिरड्यातून वाट काढत खाली येते
पुलावरून पाहशील तेव्हा
महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती
विटक्या पत्र्यांची मान पाठीत रूतलेली
खुजी घरे मोकळ्या आगपेट्यांच्या
ढिगाऱ्यासारखी दिसतील
तुला मन आणि तोल सावरत
खाली यावं लागेल
खाली येशील तेव्हा
चिरकणारे रेकॉर्ड
दारूच्या गुत्त्यावरील कोलमडणारे संवाद
छक्केपंजे, बादशाहबेगमचे रोजचेच विवाद
चारदोन शिव्याही तुझ्या कानी पडतील…कदाचित
शरमू नकोस
फाटक्या कपड्यांतील काही छोटी मुलं
तुला कुतूहलानं पाहत असतील
त्या वाट हरवलेल्या मुलांनाच
माझ्या घराची वाट विचार
तुझ्या अत्तराच्या सुगंधानं चाळ दरवळेल
त्या मुलांच्या मागून तू ज्या वाटेनं येशील
कदाचित त्या वाटेवर मागे चाळ गोळा होईल
बिथरू नकोस
जेव्हा तू मोठी गटार ओलांडून येशील
तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डर्सच्या भल्याथोरल्या
होर्डिंगच्या लोखंडी पायाच्या आधारानं
माझं घर उभारलेलं दिसेल
माझ्या दहा बाय दहाच्या घरात येशील तेव्हा
माझ्या भाबड्या आईचं गबाळं स्वागत
बनियान टॉवेलातला मी
आमची कण्हतधुपत पेटणारी चूल
काळाकुळकुळीत चहा
आमचं ऑल इन वन घर
…हे सारं
तुला किळसवाणं वाटल्याची खूण
तुझ्या डोळ्यांत पाहून
मी स्वतःची घृणा करण्यास विवश होईन
तुझं माझ्यावर असीम प्रेम आहे
तुझे ‘डॅड’ मला नवंकोरं भविष्य विकत घेऊन देतील
हे ठिकय…पण
मी माझी घृणा करेन इतपत
मेहरबानी करू नकोस माझ्यावर
माझ्या गरीबखान्यात येऊ नकोस शक्यतो
तू रंगवलेली स्वप्नं इथल्या भूमीत
अंकुरणार नाही
आणि मला बोन्साय होणं मान्य नाही
तू तुझी स्वप्नबीजं घेऊन जा
एक नवी सुपीक जमीन शोध
माझ्या या वांझोट्या भूमीला
कधीतरी दिवस जातीलच
इथेही फुले फुलतील
स्वप्न साकारतील
पण तोवर
मला माझ्या स्वप्नांचं खतपाणी करून
मला स्वतःलाच गाडून घ्यायला हवं
माझ्या या चुरगळलेल्या माणसांसाठी
– नागराज मंजुळे.
Discussion about this post