हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता किरण माने यांनी एखादी पोस्ट शेअर केली आणि ती चर्चेत आली नाही असं कधीच झालं नाही. हरहुन्नरी अभिनेता आणि उत्तम वक्ता म्हणून किरण माने यांच्याकडे पाहिलं जातं. किरण माने नेहमीच विविध विषयांवर थेट आणि स्पष्ट बोलणे पसंत करतात. अनेकदा यामुळे ते अडचणीत आले आहेत. मात्र त्यांनी आपली भूमिका नेहमीच परखड मांडली आहे. काही वर्षांपूर्वी धडपड करीत इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमावणारे किरण माने फार कमी लोकांना माहित आहेत. संघर्षाच्या वेळी त्यांनी मुंबईत पाऊल ठेवल्यानंतर नाट्यमंडळींच्या पंढरीची ओळख करून घेतली. त्याबद्दल सांगताना त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांची हि पोस्ट आहे मुंबईतील दादरमधल्या शिवाजी मंदिर नाट्यगृहाविषयी.. किरण माने यांनी लिहिलंय कि, “इथं शिवाजी मंदीर कुठंय हो?”…पंचवीस वर्षांपुर्वी, आयुष्यात पहिल्यांदा सातार्याहून मुंबईला आल्यावर, दादर हिंदमाताला उभा राहून मी पत्ता विचारत होतो!…आणि परवा, ७ जूनला मी शिवाजी मंदिरच्या गेटवर येताच ढोल, ताशे, तुतारीच्या गजरात, माझं औक्षण करून स्वागत होत होतं.. यावेळी या वास्तूत पाऊल ठेवलेला ‘तो’ पहिला दिवस आठवला. तिथून इथवर येईपर्यन्तचा भयाण, जीवघेणा संघर्ष ‘फास्ट कट’मध्ये डोळ्यांपुढून गेला… मुंबईनगरी पहिल्यांदाच बघत होतो. मायणीत-सातार्यात शिवाजी मंदिर नाट्यगृहाबद्दल लै ऐकलंवतं. ‘नाटकवाल्यांची पंढरी’ बघायची लै उत्सूकता होती. टॅक्सी वगैरे करण्याइतके पैसे नव्हते खिशात. उन्हात चालत, घामाघूम होत, बरीच भटकंती करून शिवाजी मंदिर शोधलं. पाऊल ठेवताच भारावून गेलो.. एका वेगळ्याच विश्वात आल्यासारखं झालं !
नाटकांचे बोर्डस् बघून डोळे दिपले. ‘व्यक्ती आणि वल्ली’ , ‘ऑल द बेस्ट’ , ‘गेला माधव कुणीकडे’… येडाच झालो !! म्हटलं ‘बस्स्स ! आपला शोध संपला. आपल्याला यातच करीयर करायचं. इंजिनियरिंग वगैरे सगळं झूठय. एक ना एक दिवस आपल्या नाटकाचा इथं बोर्ड लागला पायजे.’…आजवर माझी दहा नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर आली. त्यातील आठ नाटकांत मी प्रमुख भुमिका केली. त्या सगळ्या नाटकांचे बोर्डस् तिथे माझ्या फोटोसहित अनेकवेळा लागले! …परवाही बोर्ड लागला. त्याच शिवाजी मंदिरला, त्याच ठिकाणी. पण त्या बोर्डवर लिहीलंवतं – “शिवराज्य ब्रिगेडतर्फे अभिनेता किरण माने यांना कलाक्षेत्रातला ‘स्वराज्य भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे !”
लै लै लै समाधान वाटलं. मला लहान भावासारखे असलेले आ.अमोल मिटकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्विकारणं, हे तर निव्वळ सुख. मिटकरींचं खुमासदार, चौफेर टोलेबाजी करणारं आणि अभ्यासपूर्ण भाषण ऐकणं म्हणजे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’… शिवराज्य ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अमोलभैय्या जाधवराव यांनी कार्यक्रमाचं उत्तम आणि देखणं संयोजन केलं. काॅंग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे आणि शिवाजी मंदिरचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला चार चांद लागले ! तुका म्हणे आता । आनंदी आनंदु । …विस्तारला ।। – किरण माने.
Discussion about this post