हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच प्रदर्शित झालेला नागराज मंजुळेंचा ‘घर बंदुक बिरयानी’ हा चित्रपट अनेक प्रेक्षकांनी पाहिला आणि संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. कुणाला हा चित्रपट फार आवडला.. तर कुणी ओके ओकेचा शेरा दिला. चित्रपटात नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर हेमंत अवताडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट ‘बिग बॉस मराठी’ फेम किरण माने यांनी पाहिला आणि यावर आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
किरण माने यांनी लिहिलंय, ‘पिच्चर तसा बरा हाय. एवढाबी वाईट नाय राव. मी काही प्रमाणात एंजॉयबी केला. पण… सोशल मिडीयावर आण्णाला ट्रोल करणार्यांनी आणि त्याच्या खुशमस्कऱ्यांनी दोघांनीही वात आणलावता. आण्णाला टॅग करून, ओढूनताणून सिनेमातले सिंबॉलिजम आणि नको ते अन्वयार्थ काढून भरभरुन परीक्षणे लिहिनाऱ्यांना उत आलावता… दुसर्या बाजूला नावं ठेवनाऱ्यांनीबी लैच भंगार पिच्चर असल्यागत सरसकट ठेचायला सुरवात केलीवती. अधलीमधली काय भानगडच नव्हती. ह्या गदारोळात कुठलाच पूर्वग्रह नको म्हनून सिनेमा थोडा उशीराच बघायचा ठरवला. नागराजचा पिच्चर बघनं हे हल्ली कुठल्याबी अस्सल सिनेरसिकाचं आद्यकर्तव्यच… त्यानं मराठी सिनेमात ‘जान’ आनली…मराठी सिनेमाला देशभरात प्रतिष्ठा मिळवून दिली… गांवखेड्यातल्या अनेक होतकरू, प्रतिभावान दिग्दर्शकांना प्रेरणा दिली, हे नाकारून चालनारच नाय. पण ते डोक्यात ठेवून उगीच कशाचीबी खोटी स्तूती करणं चुकीचं आहे. मला तरी तसली सवय नाय. जे हाय ते…
तर ‘घर बंदूक बिर्याणी’ अगदीच वाईट सिनेमा नाय. सामान्य प्रेक्षक कुठंच लै बोअर वगैरे होनार नाय. तरीही त्यांची आणि जाणकारांची बर्यापैकी निराशाही करतो. जेवताना एक भाजी लैच चविष्ट लागावी आन् एक लैच फसलेली असावी, तसं कायतरी होतं. सिनेमा तुकड्या-तुकड्यात आवडून जातो. कंटाळवाणा नाय, पण अजून लैच इंटरेस्टिंग झाली असती, अशी स्टोरी वाया गेल्याची रूखरूख लागून रहाते एवढं नक्की. खरंतर ‘घर बंदूक बिर्याणी’ ही गोष्ट मुळात राजू आचार्याची आहे. तो कथेचा ‘खरा’ हिरो आहे. पल्लम आणि राया सपोर्टिंग आहेत. पण या दोघांचं महत्त्व नको इतकं वाढवल्यामुळं सिनेमा भरकटतो. मुळात सयाजी शिंदे आणि नागराज ऐवजी, प्रेक्षकांना फारसे माहित नसलेले प्रतिभावान अभिनेते घेतले असते आणि त्यांना मोजक्याच सिन्समध्ये मर्यादित ठेवलं असतं, तर सिनेमा जास्त मनोरंजक झाला असता.
…रायाला विनाकारण डॅशिंग हिरो केल्यामुळे सिनेमाची फक्त लांबी वाढते.. ‘भर’ काहीच पडत नाही. इन्स्टावर रील बनवणारी पोरंठोरं ‘स्लो मोशन’मध्ये चालतात-पळतात… त्यांचं त्यांनाच लै भारी वाटत असतं. बघणार्यांना त्याचं कणभरबी अप्रूप नसतं. तसं या पिच्चरमधल्या हायस्पीड शॉट्सचं झालंय. कथानक मध्येच थांबतं आणि दहा-दहा मिनिटं ही ‘हळुवार’ फायटिंग सुरू रहाते. तिच गोष्ट पल्लमची. सयाजीबापू गेली अनेक वर्ष ‘शूल’ मधला तोच तो बावळट कॉमेडी व्हिलन शेकडो सिनेमांमधून रिपीट करत आहेत. क्षमता त्याहून जास्त असतानाही. त्यामुळे आता त्यांची ‘कीव’ येऊ लागलीय. त्यांनी स्वत:हून असे रोल्स टाळायला हवेत. सिनेमा उगं रटाळ लांबड लावतो, तो या दोघांच्या अनावश्यक सिन्समुळे. त्यापेक्षा प्रविण डाळींबकर घुरा भाव खाऊन जातो. नाववाल्या अभिनेत्यांनी हा सिनेमा भरकटवला तरीही तो ‘होल्ड’ केला ते राजू, घुरा, जॉर्ज, चिल्लम, लक्ष्मी, ढमाले, मारीया अशी अनेक अस्सल कॅरॅक्टर्स साकारणार्या, नाव नसलेल्या नवोदित अभिनेत्यांनी!
कोरी पाटी ठेवुन बघितला तर पिच्चर सुसह्य होतो. काही विधानं सोडली तर सामाजिक वगैरे काही नाही यात. शोधूही नका. म्युझीकबी ठीकठाक आहे. ग्रेट-बिट नाही. काही संवाद ‘कच्चं इम्प्रोवायजेशन’ वाटावं इतके बाळबोध आहेत. पण हा सिनेमा वाईट नाही. ‘पैसे वाया गेले’ असं वाटायला लावणाराही नक्कीच नाही. अनेक सिन्स ‘दिल खुश’ करून टाकणारे होते. सरेंडर व्हायला आलेल्या खबरीनं बंदूक काढताच वकिलाची उडालेली भंबेरी पाहून खळखळून हसलो. “सरपटणाऱ्यापासून उडणाऱ्यापर्यंत आम्ही सगळं खाणार” वाल्या डायलॉगला दाद दिली. वाघमारे आणि ढमालेंचा जो नालायकपणा दाखवलाय, तो पाहून रागही आला. बोलीतले आणि लहेजामधले बारकावे समजणार्यांसाठी काही संवाद रंजकता वाढवतही होते. हेमंत अवताडे हा दिग्दर्शक पुढच्या काळात नक्कीच लै भन्नाट कायतरी घेऊन येण्याची क्षमता असणारा आहे, यात शंका नाही. त्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा! किरण मानेंची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धी मिळवलेल्या किरण मानेंनी अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे.
Discussion about this post