हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने नेहमीच आपल्या विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. अलीकडच्या काळात मालिकेतून अचानक बाहेर केल्यामुळे एक वेगळाच वाद निर्माण झाला होता आणि या वादामुळे किरण माने फार चर्चेत आले. पण त्यानंतर त्यांची सोशल मीडियावरील सक्रियता त्यांना चाहत्यांच्या आणखीच जवळ घेऊन आली. अलीकडेच मुंबईतील दादर येथे शिवाजी मंदिर नाट्यगृहात एक पुरस्कार सोहळा पार पडला. या दरम्यान त्यांनी काही खास पोस्ट सोशल मीडियावर केल्या. ज्यातील एकात शिवाजी मंदिर आणि किरण माने यांचं जूनं नातं त्यांनी उलघडल होत. यानंतर आता शिवाजी मंदिराशी संबंधित बाळू चहा वाल्यासाठी त्यांनी खास पोस्ट केली आहे.
किरण माने यांनी लिहिलं कि, बाळू चहावाला ! कुठल्याबी नाटकवाल्याला शिवाजी मंदिरला गेल्यानंतर बाळू चहावाला भेटला नाय, तर पंढरीला जाऊन ‘इठोबा’चं दर्शन न झाल्यागत हुरहुर लागते. लै निरागस भोळाभाबडा माणूस. मायाळू. नाटकवेडा. शिवाजी मंदिरला प्रयोग असला, की नाटक सुरू व्हायच्या आधी आणि इंटरव्हलला बाळूचा चहा कर्रेक्ट टायमिंगला येनारच. नाटकातल्या अमुक नटाला चहा लागतो, तमुक नटीला काॅफी लागते, तमुक ज्येष्ठ नटाला साखर चालत नाय… सगळं-सगळं बाळूच्या मेंदूच्या काॅम्प्यूटरमधी फिट्ट असतं.
माझ्या पहिल्या नाटकापास्नं आजपर्यन्त बाळू माझा फॅन. माझी आवर्जुन चौकशी करणार. कधीकधी मी प्रयोगाला सातारवरून डायरेक्ट थिएटरवर यायचो. मेकअपरूममध्ये माझी बॅग पाहून त्याला कळायचं. धावपळीत मी काही खाल्लंय की नाही, याची काळजी वाटायची त्याला. मग प्रयोगाआधी तो माझ्यासाठी शिवाजी मंदिरचा स्पेशल वडापाव आणून आग्रह करून खायला घालणार… येणार्या प्रत्येक नाटकावर बाळूचं बारीक लक्ष असतं. नाटकाच्या इंटरव्हलला कॅन्टिनजवळ प्रेक्षकांची चर्चा ऐकून ‘हे नाटक प्रेक्षकांना आवडतंय, की नाही आवडत. यातले कुठले सिन त्यांना खटकताहेत, कुठले खूप आवडताहेत.’ याची इत्यंभूत माहिती असते त्याला.. कुठल्याबी नाटकाचं भवितव्य माहिती करून घ्यायचं असंल तर शिवाजी मंदिरचे डोअरकीपर आणि बाळूचं मत ऐकावं. बास. कुठल्याच समिक्षकाची गरज नाय.
…परवा माझ्या सत्काराला बाळू आवर्जुन उपस्थित होता. सोहळा संपल्यावर भेटायला आला. तीच मायाळू नजर. यावेळी त्या नजरेत अभिमान होता. म्हणाला ‘फोटो काढायचाय.’ फोटो काढल्यावर काळजीनं मला विचारलं, ‘सातारवरुन थेट आलाय का? जेवुन घ्या.’ मला भरून आलं. बाळूसारखी निर्मळ मनाची माणसं पाहिली की द्वेषाने आणि विखाराने बरबटलेल्या या जगात अजूनही चांगूलपणा, निरागसता, निरपेक्ष प्रेम शिल्लक आहे, हा दिलासा मिळतो… लब्यू बाळू – किरण माने.
मुख्य सांगायचं म्हणजे, शिवाजी मंदिर येथे गेल्या अनेक वर्षांपासून बाळू चहावाला आपल्या फक्कड चहाने कलाकारांचा मड फ्रेश करण्याचे काम करत आहेत. मराठी सिनेसृष्टीचा आठवणीतला तारा दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी तर बाळूचा चहा म्हणजे आयुष्यात लज्जत आणणारी एक बाब होती. अतिशय खास अशा आठवणी त्यांनी बाळू चहावाल्यासोबत घालवल्या आहेत. त्यामुळे बाळू चहावाला केवळ एका अभिनेत्याची नव्हे तर कित्येक कलाकारांसाठी खास आणि राजा माणूस आहे.
Discussion about this post