हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही अभिनेता किरण माने हे नेहमीच आपल्या परखड मत प्रदर्शनासाठी ओळखले जातात. ते जितकं थेट बोलतात तितकेच जबर शब्द वापरून ते थेट लेखनही करतात. यामुळे त्यांच्या जवळपास सर्व पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आज १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शिवरायांचा उल्लेख खरे मास्टरमाईंड असा केला आहे. हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
किरण माने यांनी शिवरायांना वंदन करतानाचा फोटो शेअर केला आहे आणि सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘…शिवराय कशाच्या सहाय्यानं लढले? शारीरिक बळाच्या? तलवारीच्या? की कुणा सहकार्याच्या सल्ल्याच्या? नाय नाय नाय माझ्या दोस्तांनो… शिवरायांची ताकद एकच होती… त्यांची ‘अनल्प’ बुद्धी ! ‘अनल्प’ म्हणजे अफाट, अमर्याद. इंग्लीशमध्ये सांगायचं तर इन्फिनाईट इन्टेलिजन्स. शिवरायांच्या विलक्षण बुद्धीमत्तेचं वर्णन करताना परमानंदानं हा शब्द वापरलाय. परमानंद… एक अत्यंत प्रतिभावान शिवकालीन कवी ! होय, तोच तो ज्यानं शिवरायांच्या हयातीत, शिवरायांच्या परवानगीनं त्यांचं चरीत्र लिहीलं !!
…परमानंदाबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा वाचलं डाॅ. आ.ह. साळुंखेंच्या ‘शिवराय : संस्कार आणि शिक्षण’ या पुस्तकात. “शिवरायांसाठी परमानंदाने वापरलेला ‘अनल्पधी:’ हा शब्द माझ्या काळजाला स्पर्श करुन गेला आहे आणि मस्तकामध्ये कोरला गेला आहे.” असं आ.ह. तात्या म्हणातात. यावरूनच याचं मोल काय असेल ते आपण ओळखू शकतो. …शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा कसा बाहेर काढला, आग्र्याहून कशी शिताफीनं सुटका करून घेतली, शाहिस्तेखानावर कसा छुपा हल्ला केला. या सुरस कथा आपण कायम ऐकतो… पण हे सगळं त्यांनी फक्त ताकदीवर, किंवा शस्त्रास्त्रांच्या मदतीनं केलं नाही… प्रत्येक लढाई शिवराय ‘बुद्धीनं’ लढले. शक्तीचा आणि शस्त्रांचा वापर करण्याआधी, त्यांच्या प्रत्येक चालीवर बुद्धीचा लगाम होता. खर्या अर्थानं ‘मास्टरमाईंड’ !
माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्या कर्तबगारीचा उगम मेंदूतूनच होतो. आपण कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असूद्यात…तिथे आपण जे काही ‘ॲचिव्ह’ करतो, कमावतो, पराक्रम गाजवतो, त्या सगळ्याचं मूळ असते ‘बुद्धी’. आपलं बोलणं, आपल्या हालचाली, आपली ताकद, आपण व्यक्त होण्यासाठी जे जे काही वापरतो… मन असो वा मनगट, पेन असो वा पिस्तूल… कशालाही ताकद देण्याचं, योग्य दिशा दाखवण्याचं, भान आणि नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करत असेल तर ‘बुद्धी’ ! …आपल्याला जर शिवरायांच्या महान कार्याचा अभिमान बाळगायचाय, तर त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींबरोबरच या ‘अनल्प बुद्धी’चा वारसा घेणं आजच्या काळात लै लै लै गरजेचं आहे. विवेकाच्या शत्रूचा सामना करताना, जर बुद्धीनं लढायचं तंत्र आपण शिकलो, तर सच्च्या शिवभक्ताला कुठलीबी लढाई अवघड नाही !!! जय शिवराय. – किरण माने.
Discussion about this post